Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस उत्साहात

डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस उत्साहात 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली बुकीज यांच्या वतीने ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस तसेच साप्ताहिक वाचन उपक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी आपली आमराई, सांगली येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विज्ञान, कल्पनाशक्ती आणि वाचन संस्कृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर व वाचनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात सहभागींच्या वैयक्तिक विज्ञानकथा वाचनाने झाली. त्यानंतर श्री. संभाजी दाणेकरी यांनी उपक्रमाची प्रस्तावना करून डॉ. जयंत नारळीकर यांच्या विज्ञान प्रसारातील योगदानाचा गौरव केला. यावेळी यशवंत शिंदे, श्रद्धा सूर्यवंशी, सम्यक संबोधी, श्रेया मासाळ आणि इंद्रायणी महाजन, युवराज खरात यांनी विज्ञान कथांचे प्रभावी अभिवाचन केले. कवी आनंदराव जाधव यांनी विज्ञान आणि कल्पनाशक्तीवर आधारित कविता सादर केली. तसेच शिक्षक असलेल्या सम्यक संबोधी यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्व 'बोलक्या बाहुल्या'च्या विशेष सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

अनुभव कथन सत्रात पोद्दार स्कूल इंटरॅक्ट क्लबच्या क्रांती पाटील, विद्यार्थी अविक दुबे तसेच वाचन चळवळीचे कार्यकर्ते तुषार मगदूम यांनी वाचनामुळे झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव सांगितले. सुदर्शन चोरगे यांनी सांगली बुकीजच्या वाचन चळवळीची माहिती देत अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वाचनाची शपथ घेतली, तर ईशानी गाट यांच्या झेंबे वादनाने कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

यावेळी क्रांती पाटील, श्रुती निलख, मीना पिंजारी, डॉ. गौरी सगरे, शैलेंद्र पेंडे, निवृत्त प्राचार्य प्रकाश वायदंडे, निवृत्त पोलीस अधिकारी प्रल्हाद मगदूम, आशु खान, विशाल कोठावळे, अमित काटकर, मल्लाप्पा आवळे, शीतल मासाळ, ईश्वर रायन्नावर, तात्यासो कदम आदी उपस्थित होते.  नियोजन सुहास गवळी, रोहन ऐवळे, अमेय गाट, सुजाता मराठे, पलक समाजे, ॲड. असिफ मुजावर आणि ॲड. अक्षय राजगे यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.