आता 'जेन-झी'ला बोलणेही मुश्किल
पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे वक्तव्य
नागपूर : खरा पंचनामा
'जेन-झी भारताचे भविष्य आहे. पण, सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही. त्यांना काही बोलणेदेखील मुश्किल झाले आहे,' असे वक्तव्य पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी केले. भोसला मिलिटरी स्कूलतर्फे कारगिल विजय दिनानिमित्त सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील बोलत होते.
व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या नागपूर विभागाचे अध्यक्ष सूर्यरतन डागा, सचिव राहुल दीक्षित, भोसला मिलिटरी स्कूलचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, कमांडंट कर्नल अमरेंद्र हरदास, भोसला मिलिटरी स्कूलचे मुख्याध्यापक अजय शिर्के आणि भोसला सैनिक स्कूलचे मुख्याध्यापक जे. एस. रिआर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नांगरे पाटील म्हणाले, 'सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढला आहे. सेकंदागणिक मन स्क्रोल होत आहे. त्यातून 'केमिकल लोचा' निर्माण झाला आहे. बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक गुणांकासह कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमताही प्रत्येकामध्ये असायला हवी. यासाठी उमलत्या वयापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे.'
कारगिल युद्धाचा उल्लेख करताना ते म्हणाले, 'अत्यंत विपरीत परिस्थितीत आपल्या वीर सैनिकांनी प्राणांची आहुती देत युद्ध जिंकले. कारगिल विजय दिवस हा युद्धातील विजयाचा जल्लोष करण्याबरोबरच देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मरणाचाही दिवस आहे.'
कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांचा रूट मार्च काढण्यात आला. कार्यक्रमस्थळी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कमांडंट कर्नल अमरेंद्र हरदास यांनी कारगिल युद्धाची माहिती दिली. सूत्रसंचालन सुमेधा चावरे यांनी केले, तर आभार अजय शिर्के यांनी मानले.
'पोलिस असो वा सीमेवरील जवान, त्यांची ड्युटी ही थैंकलेस जॉब आहे. कितीही काम केले, तरी पोलिसांना शिव्या बसतातच. गेल्या आठ दिवसांपासून तर मी अधिकच शिव्या खातोय,' असे सांगत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील अलीकडच्या हत्यासत्रामुळे पोलिसांवर होत असलेल्या टीकेला मिश्किल शैलीत उत्तर दिले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.