पदवीधर निवडणुकीत समाजाचा उमेदवार उभा करून राजकीय लढा उभारणार
मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून पुन्हा फसवणूक : पुण्यातून आंदोलनाची दिशा
सांगली : खरा पंचनामा
राज्य शासनाने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण तुलनेत कमी आहे. तसेच हे आरक्षण ५० टक्केवरील असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितल्यामुळे ते धोक्यात आले आहे. आरक्षण आणि इतर मागण्यांबाबत शासनाने फसवणूक केली आहे. त्यामुळे आठ दिवसात निर्णय न घेतल्यास पुणे येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. प्रसंगी पदवीधर निवडणुकीत समाजाचा उमेदवार उभा करून राजकीय लढा उभारला जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत भोसले, विलास देसाई, डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण धोक्यात आणण्याचे काम सरकारने केले आहे. शासनाने ओबीसी धर्तीवर शैक्षणिक सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला. परंतू त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सवलती लागू करण्याचे आदेश अद्याप दिले नाहीत. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेची थकबाकी दिलेली नाही. एमबीबीएस व अन्य पदवी शिक्षण घेणाऱ्यांना ५० टक्के विकसन शुल्क माफीचा निर्णय घेऊनही ती सवलत अचानक बंद केली आहे. थकीत विकसन शुल्क देण्याबाबतही निर्णय घेतला नाही. एसईबीसी विद्यार्थ्यांना सवलती व आरक्षणाचा लाभ घेताना वार्षिक उत्पन्नामध्ये ओबीसीप्रमाणे शेती व नोकरीतील उत्पन्न न पकडण्याची सूट मराठा समाजाला लागू नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार आहेत.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थी कर्जदारांना व्याज परतावा देण्यासाठी जवळपास १४०० कोटी रूपये आवश्यक असताना शासनाने केवळ ७५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तर केवळ १५० कोटी रूपये वर्ग केले आहेत. व्याज परतावा वेळेत मिळत नसल्यामुळे उद्योजक संकटात आहेत. तसेच निधी नसल्याने नवीन कर्ज वाटपाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे महामंडळ डबघाईला येणार आहे. सारथी संस्थेला वाढीव निधी तसेच निर्णयाबाबत स्वायत्तता देण्यासाठी शासन उदासीन दिसून येते. समाजाच्या मागण्याबाबत तत्काळ निर्णय न घेतल्यास सामाजिक व राजकीय आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात पुणे येथे सर्व संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.
यावेळी राहुल पाटील, दादासाहेब पाटील, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.