Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लुटणारा नराधम नातजावई अटकेतसांगली एलसीबीची धडक कारवाईपहा व्हिडीओ

वृद्ध महिलेची हत्या करून दागिने लुटणारा नराधम नातजावई अटकेत
सांगली एलसीबीची धडक कारवाई
पहा व्हिडीओ 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेला जबरदस्तीने लुटून, तिच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून देणाऱ्या नराधमाला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पकडण्यात आलेला आरोपी दुसरा कोणी नसून मयत महिलेच्या नातीचा पती (नातजावई) राजेश दिलीप गायकवाड (रा. बलवडी, ता. खानापूर) हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मालन मारुती जाधव (वय ८३ वर्ष, रा. शेटफळे) या अनेक वर्षांपासून त्यांच्या कुटुंबापासून विभक्त राहत होत्या. अलीकडेच मागील दीड महिन्यापासून त्या त्यांचा नातू प्रवीण जाधव याच्या घरातील एका खोलीत राहण्यास आल्या होत्या. त्या गावात लोकांना हातउसने पैसेही देत असत.

दिनांक ३० जून २०२६ रोजी पहाटे २:४५ वाजण्याच्या सुमारास मालन जाधव या लघवीसाठी घराबाहेर आल्या होत्या. त्या परत घरात जात असताना मागून आलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले. चोरट्याने त्यांच्या छातीत लाथा मारून आणि हात पिरगळून त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने ओरबाडण्यास सुरुवात केली. वृद्धेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना काडेपेटीने पेटवून दिले. यानंतर आरोपी १४ ग्रॅम सोन्याचे आणि ३० भार चांदीचे दागिने घेऊन फरार झाला.

उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू
गंभीररीत्या भाजलेल्या मालन जाधव यांना उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालय आटपाडी आणि त्यानंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बेशुद्ध होण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला, विठ्ठल मारुती जाधव यांना घडलेला प्रकार सांगितला. विठ्ठल जाधव यांच्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, उपचारादरम्यान जखमा गंभीर असल्याने दिनांक ३ जुलै २०२६ रोजी वृद्ध मालन जाधव यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते आणि वृद्धेचा जबाब नोंदवण्यापूर्वीच ती बेशुद्ध झाल्याने पोलिसांकडे आरोपीचे कोणतेही वर्णन किंवा धागेदोरे नव्हते. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) समांतर तपास करून आरोपीला तात्काळ शोधण्याचे आदेश दिले होते.

गोपनीय माहितीवरून नातजावई जेरबंद
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की, मयत महिलेच्या नातीचा नवरा राजेश गायकवाड यानेच हा गुन्हा केला आहे.

त्यानुसार पोलिसांनी संशयित राजेश दिलीप गायकवाड याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. वृद्ध महिला घरात एकटीच असल्याचा फायदा उठवून त्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि वृद्धेने प्रतिकार केल्यामुळे तिला जिवंत पेटवून दिल्याचे त्याने मान्य केले.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, आटपाडीचे पोलीस निरीक्षक संतोष पवार, सपोनि प्रशांत निशाणदार, पोउनि कुमार पाटील तसेच पोलीस अंमलदार सुनील जाधव, अमोल लोहार, उदय साळुंखे, अभिजित ठाणेकर आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.