Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद११ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

चेन स्नॅचिंग करणारे २ सराईत गुन्हेगार जेरबंद
११ लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई 

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून (चेन स्नॅचिंग) चोरी करणाऱ्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील दोन अट्टल गुन्हेगारांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ६४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल असा एकूण ११ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेले आरोपी लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय ३४, रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली), अमित नानासो बुधावले (वय २७, रा. शहापूर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर; मूळ गाव: विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) असे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे शिराळा आणि कोकरूड पोलीस ठाण्यातील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. कापरी फाटा (शिराळा) घटना: २७ जून २०२६ रोजी फिर्यादी मनीषा सुनील पाटील (रा. टोप, कोल्हापूर) या त्यांच्या पतीसोबत मोटारसायकलवरून लग्नकार्यावरून जात असताना, मागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला होता.

आरळा (कोकरूड) घटना : १६ मे २०२६ रोजी आरळा गावातील चौगुले मळ्याकडे पायी जाणाऱ्या एका महिलेचे दागिनेही याच पद्धतीने दुचाकीवरून आलेल्या चोरांनी हिसकावले होते. चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक तपास करत होते.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात आली. दरम्यान, ८ जुलै २०२६ रोजी पोलीस अंमलदार संकेत कानडे, अभिजित माळकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी लक्ष्मण चाळके आणि अमित बुधावले हे दोघे चोरीचे दागिने विकण्यासाठी आष्टा ते सांगली रोडवरील लक्ष्मी फाटा परिसरात पल्सर मोटारसायकलवरून येणार आहेत. माहिती मिळताच पथकाने लक्ष्मी फाटा येथे पाळत ठेवून सापळा रचला. संशयित आरोपी तेथे येताच पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. अधिक चौकशीत त्यांनी कापरी फाटा आणि आरळा येथील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली.

जप्त केलेला मुद्देमाल
लक्ष्मीहार, गंठण आणि मंगळसूत्र असे ९,४२,५००/- रुपये किमतीचे ६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १,६०,०००/- रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर (N160) मोटारसायकल असा एकूण मुद्देमाल: ११,०२,५००/- रुपये इतका आहे.

आरोपींवर आधीच गंभीर गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. आरोपी लक्ष्मण चाळके याच्यावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आधीच चेन स्नॅचिंग आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर दुसरा आरोपी अमित बुधावले याच्यावर खून (Murder) आणि खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) यांसारखे अतिगंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल शिराळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. 

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाने सपोनि प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, अतुल माने, संदीप गुरव, उदयसिंह माळी, प्रकाश पाटील आणि सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी यांच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.