Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर रद्द करा; सांगली जिल्ह्यात 'संस्कार शिक्षण अभियान' राबविणाररावसाहेब पाटील यांची माहिती

शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर रद्द करा; सांगली जिल्ह्यात 'संस्कार शिक्षण अभियान' राबविणार
रावसाहेब पाटील यांची माहिती

सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शैक्षणिक संस्थांवरील मालमत्ता कर पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये जीवन विद्या मिशन संचलित 'संस्कार शिक्षण अभियान' पुढील महिन्यापासून राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.

बैठकीत सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेकडून शैक्षणिक संस्थांच्या इमारती तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या खेळाच्या मैदानांवर व्यापारी तत्त्वावर मालमत्ता कर आकारला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शैक्षणिक संस्थांमध्ये कोणतेही वास्तव्य नसते, तसेच त्यांचा उपयोग व्यापारी किंवा नफा कमावण्याच्या उद्देशाने केला जात नाही. वस्तूंचे उत्पादन, खरेदी-विक्री अथवा व्यावसायिक व्यवहारही येथे होत नसल्याने शैक्षणिक संस्थांना व्यापारी मालमत्तेच्या निकषावर कर आकारणे अन्यायकारक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शिक्षण संस्थांनी मोठ्या प्रमाणावर खेळाची मैदाने उपलब्ध करून दिली आहेत. मात्र, या मोकळ्या जागांवरही व्यापारी दराने कर आकारला जात असल्याने शिक्षण संस्था, विद्यार्थी आणि पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या इमारतींसह खेळाच्या मैदानांवरील मालमत्ता कर तातडीने माफ करावा, अन्यथा शिक्षण संस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

याच बैठकीत जीवन विद्या मिशनचे डॉ. दिलीप पटवर्धन यांनी 'संस्कार शिक्षण अभियान' याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, नैतिक मूल्यांची जपणूक, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ. पटवर्धन व त्यांचे सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीस आर. एस. चोपडे, विनोद पाटोळे, प्रा. शिवपुत्र आरबोळे, डॉ. भारत दुधाळ, वैभव गुरव, प्रा. होर्तीकर, प्रकाश चव्हाण, दिग्विजय चव्हाण यांच्यासह सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे पदाधिकारी आणि जीवन विद्या मिशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.