तुकाराम मुंढे यांच्यानंतर FSSAI आक्रमक; स्विगी इन्स्टामार्टला ९ नोटिसा
मुंबई : खरा पंचनामा
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्यापासून अन्नात 'विष कालवणाऱ्यां'चे धाबे दणाणले आहेत.
मोठ्या कंपन्यांपासून छोट्या टपरीपर्यंत अनेक ठिकाणी मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. या बातम्या वाचून तुम्ही निश्चिंत झाला असाल तर थांबा. क्विक कॉमर्स म्हणजेच १० मिनिटांत घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या अन्न सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशातील सर्वोच्च अन्न नियामक संस्था 'एफएसएसएआय' (FSSAI - Food Safety and Standards Authority of India) ने प्रसिद्ध क्विक कॉमर्स अॅप 'स्विगी इन्स्टामार्ट' ला तब्बल ९ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
एफएसएसएआयने इंस्टामार्टला पाठवलेल्या नोटीसमध्ये ग्राहकांना मुदत संपलेले, खराब झालेले, सडलेले आणि दूषित अन्नपदार्थ पुरवल्याचा गंभीर ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ग्राहकांनी तक्रार करूनही कंपनीने त्यावर कोणतीही ठोस पावले किंवा कारवाई केली नाही, उलट काही ग्राहकांना फक्त परतावा देऊन अन्न सुरक्षेच्या मूळ समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
अक्षयकल्प ऑरगॅनिक अंडी या कंपनीची अंडी फक्त मुदत संपलेली नव्हती तर त्यातून दुर्गंधी येत होता. तर हेल्थिफाय १००% व्हे प्रोटीन आणि मॉईस मद्रास मिक्स्चर ही उत्पादने त्यांची एक्सपायरी डेट संपल्यानंतरही ग्राहकांना डिलिव्हर करण्यात आली. काक्के दा पराठावरुन मागवलेले अन्नपदार्थ सडलेले होते आणि त्यातून तीव्र दुर्गंधी येत होती. धक्कादायक म्हणजे लहान मुलांचे दुधाचे अन्न अत्यंत निकृष्ट आणि असुरक्षित स्थितीत आढळले. अयोग्य साठवणुकीमुळे हे उत्पादन खराब झाले होते, आणि ग्राहकाने ते परत केल्यानंतरही कंपनीने तेच खराब उत्पादन पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला पाठवल्याचा आरोप आहे. याशिवाय, प्लॅटफॉर्मवर 'नोईस एग्स' हे उत्पादन अशा ब्रँड नावाने विकले जात होते, ज्याचा उल्लेख एफएसएसएआय लायसन्सवर नव्हता.
एफएसएसएआयने स्विगी इन्स्टामार्टला या सर्व त्रुटींवर लेखी स्पष्टीकरण आणि दस्तऐवजीकरण पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कंपनीने काय उपाययोजना केल्या, याचा 'अनुपालन अहवाल' मागवला आहे.
एफएसएसएआय अधिकारी म्हणाले, "बहुतांश ग्राहक सोशल मीडिया किंवा आमच्या अॅपवर फोटोंसह तक्रार करतात. आम्ही त्याची दखल घेऊन कंपन्यांना नोटिसा पाठवतो. थेट कायदेशीर कारवाई करण्यासाठी सरकारी यंत्रणेकडून अन्नपदार्थांचे 'कायदेशीर नमुने' गोळा करावे लागतात, जे राज्यांच्या अन्न व औषध प्रशासनामार्फत गोळा केले जात आहेत. आम्ही अशा बँड्सची नावे सोशल मीडियावर उघड करत आहोत, ज्यामुळे त्यांच्या कॉर्पोरेट प्रतिमेला फटका बसतो, परिणामी कंपन्या तातडीने सुधारणा करण्यास तयार होतात."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.