NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार!
26 जुलैला मुंबईतून आंदोलनाची हाक
मुंबई : खरा पंचनामा
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 26 जुलै रोजी रविवारी आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबईत हे आंदोलन होईल. या आंदोलनात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षही सहभागी होण्याची शक्यता आहे. NEET पेपरफुटी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरोधात या मोर्चात आवाज उठवण्यात येणार आहे. ठाकरे बंधुंनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही घोषणा केली.
आम्ही 26 तारखेला शक्तीप्रदर्शन मोर्चा या मुलांना घेऊन करायचं ठरवलं आहे. मुंबईतही ही सर्व मुले एकत्र येत आहेत. आपला राग रोष व्यक्त करत आहेत. हे केंद्रालाही कळणं गरजेचं आहे. 26 तारखेला रविवारी सकाळी आम्ही मोर्चा काढत आहोत. शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत मोर्चा जाईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तर देवाला साकडं घालणार आहोत. सरकारला सुबुद्धी मिळो असं साकडं घालू. तिथे मोर्चाची सांगता होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकरी आंदोलनावेळीही ते भेटायला तयार नव्हते. मणिपूरच्यावेळीही तेच झालं. आताही तेच होतं. ही कोणती सत्ता कोणत्या सत्तेचा माज. ही मुलं काय मागत होती. नीटसाठी किती त्रास होतो हे त्या मुलांना विचारा. मी पूर्वीच मोदींना बोललो होतो नीटबाबत. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत. उद्या मुलं आत्महत्या करतील हे सांगितलं होतं. माझा जुना व्हिडिओ आहे. आज तेच झालं. आज सिस्टिमच्या विरोधातील राग आहे. देशात घरातील ज्यांची मुले परीक्षेला बसलेली नाही त्या आया आणि वडिलांनाही त्रास होतो, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबईवरील हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में ऐसी घटना होती है असं आर. आर. पाटील म्हणाले होते तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला, याची आठवण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करून दिली. त्यामुळे या प्रकरणात तुम्हीच जबाबदारी घेतली पाहिजे. हीच मागणी मुलांची आहे. तिसऱ्यांदा पेपर फुटले होते. आम्ही केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेऊ नका म्हटलं होतं. पण त्यावेळी सत्तेमुळे त्यांची ऐकण्याची तयारी नव्हती. आजही नाही. प्रधानांच्या राजीनाम्यापुरती गोष्ट मर्यादित राहिली नाही. ती पंतप्रधान आणि गृहखात्यांपर्यंत गेली. मोदींनी आज ट्विट केलं. त्याला काही अर्थ नही. या मुलांना बोलवून चर्चा केली असती. प्रकरण समजून घेतलं असतं तर एवढं प्रकरण झालं नसतं. सत्तेचा उद्दामपणा कशासाठी आहे, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.