त्यांना काय घंटा कळतंय?
हाके आणि सदावर्तेंना मनोज जरांगे यांचा टोला, म्हणाले त्यांचा मराठा समाजात फुट पाडण्याचा डाव
सांगोला : खरा पंचनामा
मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. ते सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याविषयीचे पत्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 29 ऑगस्ट रोजीपासून अंतरवाली सराटीत मोठ्या आंदोलनासाठी मराठ्यांनी तयार राहावे असे आवाहन त्यांनी केले. तर प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीसांचे ऐकूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र खरे असूनही रद्द करण्याचे काम केले आहे. प्रमाणपत्रे रद्द का केलीत? हे फडणवीस आणि शिंदे यांनी सांगावे. फडणवीसांनी नवे डाव रचले आहेत. रोड बंदोबस्त धाराशिव पासून बंद केला. माझ्यावर हल्ला झाला पाहिजे. दगडफेक झाली पाहिजे. हाणामारी व्हावी असा डाव रचलाय, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मोठा नेता असल्याचा दावा करत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर टीका केली. सदावर्तेंनी तर काल एक गाणंही गायलं. त्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दोघांवरही निशाणा साधला. या दोघांना काय घंटा कळतं? असा टोला त्यांनी हाणला. कुणबी प्रमाण पत्र रद्द करण्याचे बावनकुळेनी केलेल्या कामाची कल्पना फडणवीसांना असणारच. फडणवीसांच्या सरकारमध्ये एकाही मंत्र्याला स्वतःची भाकर खायचे देखील अधिकार नाहीत, असा आरोपी त्यांनी केला.
पंढरपुरच्या सरकोली गावात काल रात्री मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तर आज सकाळी ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे. आज सांगोल्यात जरांगे पाटील यांची दुपारी तीन वाजता कॉर्नर सभा आहे. मंत्री बावनकुळेंच्या चेहर्यावर (वर्णावर) एकेरी टीका करत समाजाच्या लेकराचं वाटोळे करणार्याला कसला आला वर्ण? आम्ही बावनकुळेच्या वाट्याला गेलो नव्हतो. बहुमतामुळे डोक्यात हवा गेलीय. सत्ताधाऱ्यांना माज आला आहे. सत्ताधाऱ्यांचा माज उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टपासून निर्णायक लढा देणार आहे. आता माघार नाही. भले राज्यातील सरकार राहिले काय अन् गेले काय आम्हाला काही फरक पडत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. काल त्यांनी सोलापूर आणि तुळजापूर परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांत समाज बांधवांशी संवाद साधला. अंतरवाली आंदोलनाने मुंबई जाम झाली की सरकारला कळ लागते. तोवर लागत नाही. आता मेलो तरी बेहत्तर पण माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.