सांगलीत दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथे दिगंबर जैन कासार समाज संस्थेच्या नूतन मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. स्व. आप्पासो अण्णाप्पा कासार बेनाडीकर सभागृहात आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन कोल्हापूर पिठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. संस्थेच्या अस्मितेचे, एकतेचे आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या या मुख्य कार्यालयाचा शुभारंभ दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील आणि जैन सिद्धांत प्रसारक मंडळाचे जीवनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोले यांनी भूषवले, तर व्यासपीठावर संघटक सुभाष दगडे, सुहास काटकर आणि प्राचार्य अशोक साळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महिला अध्यक्षा प्रभा मांगले यांच्या मंगलाचरणाने झाली. दीपप्रज्वलनानंतर संस्थेचे शिष्यवृत्ती फंड प्रमुख अशोक साळवी व जिल्हाध्यक्ष सागर घोंगडे यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना संस्थेचे कार्याध्यक्ष महावीर दुरुगकर (सोलापूर) यांनी संस्थेच्या विविध सामाजिक, शैक्षणिक व कल्याणकारी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आदर्श संस्थेचे 'पंचसूत्री' तत्त्वज्ञान विशद करून संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले, तसेच कोल्हापूर भट्टारक पिठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोले यांचा विशेष सन्मान केला.
मार्गदर्शन करताना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सांगितले की, दिगंबर जैन कासार संस्था आज महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये विस्तारली आहे. संपूर्ण समाजाला एका सूत्रात संघटित ठेवून प्रगतीच्या दिशेने नेण्याचे कार्य ही संस्था करत असून, दक्षिण भारत जैन सभा सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी राहील. याच प्रसंगी जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य तथा सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील गरजू, होतकरू तरुणांना आणि लहान व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ देण्याच्या गरजेवर भर दिला. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून शिक्षणासाठी कर्ज आणि नव्या व्यवसायासाठी अत्यंत कमी व्याजदरात व सुलभ अटींवर 'जैन आर्थिक विकास महामंडळ' मदत उपलब्ध करून देत असून, तळागाळातील बांधवांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थापक अध्यक्ष पोपटलाल डोले यांनी संस्थेच्या आजवरच्या प्रवासावर प्रकाश टाकला. अध्यक्ष विजयअण्णा कासार यांच्या अथक प्रयत्नांतून आणि त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या मोठ्या आर्थिक योगदानामुळेच आज ही संस्था स्वमालकीच्या जागेत मुख्य कार्यालय सुरू करू शकली आहे. जैन कासार संस्था केवळ नावाला नसून 'सेवा हाच धर्म' मानून अहोरात्र कार्य करणारी एक जागृत संस्था आहे. या कार्याची दखल अखिल भारतीय पातळीवरील संस्थांनीही घेतली असून, हे कार्यालय केवळ एक वास्तू नसून संपूर्ण समाजाच्या भविष्यातील प्रगतीचे आणि स्वप्नांचे हक्काचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोहळ्यात कार्यालय उभारणीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या देणगीदारांचा आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सोलापूरच्या उपाध्यक्ष नीताताई मंकणी, हुकूमचंद हेसे, बाबुराव तंगा, परभणीचे विलास वानरे, अनंत विश्वंभर, हिंगोलीचे प्रशांत कंधारकर, अमरावतीचे संजय जैन, रत्नागिरीचे अशोक मोहिरे, अजित शिराळकर, इचलकरंजीचे सुकुमार पोते, पुण्यातील उदय लेंगडे, मोतीलाल वणकुद्रे आणि दीपक डोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महावीर मांगले आणि नितीन मांगले यांनी विशेष परिश्रम घेतले, तर विलास वानरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.