बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्हे. राज्यात पाऊस वाढणार?
पुणे : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्हे असून, पुढील दोन दिवस राज्यात काही प्रमाणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे.
एल निनोची स्थिती असल्याने यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला असताना जुलैमध्ये शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे जुलैमध्ये सर्वाधिक पावसाचा ११९ वर्षांचा विक्रमही मोडीत निघाला. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे मोसमी वारे बळकट झाले, हे त्यामागील कारण होते. घाट परिसरात पावसाचा जोर जास्त असल्याने धरणांतील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीतील चारही धरणे भरली. ऑगस्टमध्येही शहर आणि परिसरात हलक्या स्वरुपात पावसाच्या सरी सुरू राहिल्या. मात्र, पावसाचे प्रमाण तुलनेने कमी झाले. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ऊन-पावसाच्या श्रावणसरींचा अनुभवही येऊ लागला आहे. आता बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे पुण्यासह राज्यात पावसाची शक्यता असल्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, शहर आणि परिसरात पुढील सहा दिवसांत आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यात पावसाचे प्रमाण काही प्रमाणात वाढण्याची चिन्हे आहेत. पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. त्याचे स्थान आणि संभाव्य वाटचाल पाहता छत्तीसगड, मध्य प्रदेशचा पूर्व भाग, ओडिशा, तसेच विदर्भालगतच्या भागातच अधिक पाऊस पडू शकतो. विदर्भ आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विखुरलेल्या स्वरुपात हलका पाऊस पडू शकतो. पुणे-मुंबईत आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.