Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एफडीएने आयुर्वेदिक १० मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावर घातली कायमची बंदी

एफडीएने आयुर्वेदिक १० मोठ्या कंपन्यांच्या उत्पादनावर घातली कायमची बंदी

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील आयुर्वेदिक औषधनिर्मिती क्षेत्रातील अनागोंदी आणि नियमभंगाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक आणि मोठी राज्यव्यापी कारवाई केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने घेतलेल्या या शोध मोहिमेत थेट १० आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर नियमांवर बोट ठेवणाऱ्या १३५ संस्थांना 'कारणे दाखवा' नोटिसा बजावण्यात आल्याने औषधनिर्मिती क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

एफडीएने राज्यभरात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल ४३४ आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची प्रत्यक्ष पडताळणी केली. या तपासणीदरम्यान तांत्रिक मनुष्यबळाची (Technical Staff) उपलब्धता, उत्तम उत्पादन पद्धतींचे (GMP) निकष, कच्च्या व तयार मालाच्या चाचणीच्या नोंदी, मानक कार्यपद्धती (SOP) आणि वितरणाच्या नोंदी यांची बारकाईने पडताळणी करण्यात आली.

या तपासणीत अनेक कंपन्यांमध्ये धक्कादायक आणि गंभीर त्रुटी आढळून आल्या. तांत्रिक व्यक्तींची अनुपस्थिती, स्वतःचा दर्जा नियंत्रण विभाग नसणे, आवश्यक यंत्रसामग्रीचा अभाव, परिसरात अत्यंत अस्वच्छता, कच्च्या मालाच्या नोंदी न ठेवणे, औषधांच्या लेबलवर चुकीची तारीख छापणे आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी नसणे अशा गंभीर चुका उघडकीस आल्या आहेत.

'या' १० आयुर्वेदिक संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्दः
१. कृष्णा हर्बल (बारामती)
२. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स (करंजा, गोंदिया)
३. आदित्य फार्मा (वडेगाव, तिरोडा)
४. अंगरस आयुर्वेद (वडेगाव, तिरोडा)
५. कालिदास गांधी (पुणे)
६. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी (सिन्नर)
७. इंडकेअर फार्मा प्रा. लि. (जेजुरी एमआयडीसी)
८. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर (अमरावती)
९. हिलॅरियस आयुर्वेद (गोंदिया)
१०. यशोदा लॅब प्रा. लि. (नाशिक)

नागरिकांच्या आरोग्याशी आणि औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कंपन्यांवर अजिबात दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. औषधनिर्मिती नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थेवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.