शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू
जयंत पाटलांचा सांगली मोर्चात इशारा
सांगली : खरा पंचनामा
शक्तिपीठविरोधात एकसंधपणाने सरकारचा अतिरेक परतवून लावूया. मोजणी करायला जर सरकारी यंत्रणा आली तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे. आंदोलन मोडून काढायला सरकारने अलीकडे खास अधिकारी या जिल्ह्यात पाठवले आहे, आपणही तेवढ्या ताकदीने आहोत.
जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा आहे. त्यामुळं सांगली जिल्हा महाराष्ट्रात सगळ्यात वेगळा जिल्हा आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव घेऊन आम्ही या लढाईला सुरुवात केली आहे. सरकारने शक्तिपीठबाबत पुनर्विचार केला पाहिजे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केला. आज शुक्रवारी सांगलीत शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर सुद्धा सहभागी झाले.
जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकारच्या समोरच्या समस्या काय आहेत? आझाद मैदानात परवा उपोषण झालं. उपोषण शेतकरी करतो, महिला करतात, आमच्या अंगणवाडीच्या सेविका करतात, आमचे विद्यार्थी करतात, लहान-लहान वेगळे घटक करतात, पण कॉन्ट्रॅक्टरने या देशात कधी उपोषण आणि आंदोलन कधी केलेलं नाही. आता या सरकारच्या विरोधात कॉन्ट्रॅक्टरांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानात. 90 हजार कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांची यांनी भागवले नाहीत. मागच्या वर्षी आमदार फंडाची जी कामं केली, त्याचेही पैसे अजून आलेले नाहीत. नवीन आमदार फंड अजून आलेला नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, बाहेरून परस्पर कर्ज काढायचं आणि ही रस्त्याची टेंडर द्यायचा उद्योग सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे.
त्यांनी पुढे सांगितले की, फक्त कोल्हापूर आणि सांगली, सोलापूर जिल्ह्यापुरता हा विरोध नाही. परभणी, हिंगोलीला मोठा मेळावा झाला, या दोन्ही मेळाव्याला राजू शेट्टी साहेब जाऊन आले. लातूरला आता थोड्या दिवसांनी मोर्चा होणार आहे. सगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकांचा विरोध आहे. लोकांचा विरोध असताना आम्ही सरकारच्या बाजूने असणाऱ्या आमदारांना म्हटलं जरा बोला. एक आमदार बोलेना, घाबरले. सत्तेत असणारा एक पण आमदार बोलेना, खासदार बोलेना. एक तर त्यांनी पाठिंबा जाहीर करावा नाही, तर या शक्तिपीठला विरोध करावा, दूध का दूध पाणी का पाणी एकदा त्यांनी करावं. दोन्ही बाजूला राहण्याचा उद्योग बंद झाला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.