Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुलगी गमावलीय. राजकारणाशी देणंघेणं नाही; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

मुलगी गमावलीय. राजकारणाशी देणंघेणं नाही; मुंबई पोलिसांच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह 

मुंबई : खरा पंचनामा 

प्रख्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची तत्कालीन व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी लैंगिक अत्याचार आणि हत्येचा संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी थेट एफआयआर नोंदवून तपास का केला नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला. केवळ सीआरपीसीच्या कलम १७४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची चौकशी करून प्रकरण का बंद केले, अशी विचारणाही खंडपीठाने केली.

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, राजकारण्यांविरोधातील तक्रारी किंवा आरोपांमध्ये न्यायालयाला रस नाही. एका वडिलांनी आपली तरुण मुलगी गमावली आहे, या संवेदनशील दृष्टिकोनातून न्यायालय या प्रकरणाकडे पाहत असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

दरम्यान, मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दोन वेळा सखोल चौकशी केल्याचे न्यायालयाला सांगितले. तपासात घातपात किंवा हत्येचा कोणताही पुरावा आढळला नसल्याने पोलिसांनी दिशाचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू असल्याचा निष्कर्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सतीश सालियन यांच्यातर्फे अॅड. नीलेश ओझा यांनी युक्तिवाद करताना दिशाचा १४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असल्यास तिच्या शरीरावर त्या स्वरूपाच्या गंभीर जखमा दिसून येणे अपेक्षित होते, असा दावा केला. तसेच शवविच्छेदनासाठी ५० ते ७२ तास म्हणजे सुमारे तीन दिवस का लागले, असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. शवविच्छेदनास लागलेल्या तीन दिवसांच्या विलंबाचा मुद्दा यापुढील न्यायालयीन सुनावणीत महत्त्वाचा ठरू शकतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.