कॉकरोच जनता पार्टीनं निवडणूक लढवली, तर मतदान करणार का? सर्व्हेतून चक्रावणारे आकडे समोर
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका टिप्पणीतून जन्माला आलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं अवघ्या तीन महिन्यांत मोठा टप्पा गाठला आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलनाची हाक देत सीजेपीनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सीजेपीच्या आंदोलनाचा जोर पाहता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता सीजेपीबद्दल एक महत्त्वाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. त्यातील आकडेवारी अतिशय रंजक आहे.
इंडिया टुडे आणि सी-व्होटरच्या 'मूड ऑफ द नेशन'च्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या कॉकरोच जनता पार्टीबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. सीजेपीनं केवळ दबाव गट म्हणून काम करावं का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न सर्व्हेत सहभागी झालेल्यांना विचारण्यात आला. त्यावर ३९ टक्के लोकांनी सीजेपीनं केवळ दबाव गटच राहायला हवं, असं मत नोंदवलं. तर २६ टक्के लोकांनी सीजेपीनं निवडणूक लढवावी, असं मत व्यक्त केलं.
अभिजीत दिपके यांच्या सीजेपीबद्दल लोकांच्या मनात कुतूहल, उत्सुकता असल्याचं सर्व्हेतून स्पष्ट होतं. पण सीजेपीनं निवडणुकीचं राजकारण करावं, असं बहुतांश जणांना वाटत नाही. एका मोठ्या समूहाला सीजेपीनं केवळ दबाव गट राहावं असं वाटतं. तर केवळ एक चतुर्थांश लोकांना सीजेपीनं राजकारण करावं, असं वाटतं.
सीजेपीनं निवडणूक लढवली तर मतदान करणार का, असा थेट प्रश्नही सर्व्हेत विचारण्यात आला. त्यावर ३३ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिलं. तर ४३ टक्के लोकांनी नकारार्थी मत व्यक्त केलं. याचा अर्थ निवडणुकीच्या राजकारणात उतरण्यासाठी सीजेपीला अजून बराच मोठा पल्ला गाठावा लागेल.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्यावरील सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांसाठी कॉकरोच असा शब्द वापरला. तेव्हा अमेरिकेत असलेल्या अभिजीत दिपके नावाच्या तरुणानं एक्सवर एक पोस्ट केली. सगळे कॉकरोच एकत्र आले तर, अशी प्रश्नार्थक पोस्ट दिपके यांनी केली. त्यानंतर दिपके यांनी इन्स्टाग्राम, ट्विटरवर कॉकरोच जनता पार्टी नावानं ऑनलाईन अकाऊंट तयार केली. त्याला तरुणाईनं जोरदार प्रतिसाद दिला. दिल्लीत जंतरमंतरवर नीट पेपर फुटीविरोधात दिपके यांच्या नेतृत्त्वात सीजेपीनं पहिलं मोठं आंदोलन केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.