११ पिस्तूल, २२ जिवंत काडतुसांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!
सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ३ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ११ देशी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्रे), २२ जिवंत काडतुसे (राऊंड्स) आणि २ स्पेयर मॅगझिन असा एकूण ७,६२,२१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश आदाटे हा पिस्तूल खोचून नेलकरंजी फाटा (आटपाडी ते भिवघाट रोड) येथे थांबला आहे.
पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून मयुरेश आदाटे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
धागेदारे शोधत मुख्य साखळी उघडकीस
आरोपी मयुरेशची सखोल चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल मारुती गुजले याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच खरसुंडी ते बलवडी रोडवर सापळा रचून मारुती गुजले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ पिस्तूले आणि ६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
त्यानंतर मारुतीने सदरची हत्यारे वैभव उर्फ गब्बर इंगळे याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आटपाडी येथील स्वादिष्ट मच्छीफ्राय सेंटरसमोरून वैभव इंगळे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये ७ पिस्तूले, १४ जिवंत काडतुसे व २ स्पेयर मॅगझिन मिळून आले.
अटक करण्यात आलेले आरोपी मयुरेश मनोहर आदाटे (वय २५, रा. विटा, ता. खानापूर, सध्या रा. चाकण, पुणे), मारुती अशोक गुजले (वय २४, रा. जांभूळमळा, ता. खानापूर, जि. सांगली), वैभव उर्फ 'गब्बर' संजय इंगळे (वय २१, रा. ताडाची वाडी, ता. खानापूर, जि. सांगली, सध्या रा. चाकण, पुणे), पाजी (रा. सेंधवा, मध्य प्रदेश - फरार / शोध सुरू) असे आहेत.
मध्य प्रदेशातून सोशल मीडियाद्वारे रॅकेट!
चौकशी दरम्यान आरोपी वैभव इंगळे याने धक्कादायक खुलासा केला. त्याने हे पिस्तूल मध्य प्रदेशातील 'पाजी' नावाच्या व्यक्तीकडून व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि इंस्टाग्राम (Instagram) द्वारे संपर्क साधून, जास्त दराने विक्री करण्यासाठी आणले होते.
या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक कुमार पाटील, संजय पाटील, सूर्यकांत सांळुखे, अतुल माने, हणमंत लोहार, सुशिल मस्के, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, ऋतुराज होळकर, सुमित सुर्यवंशी, रोहन घस्ते, गणेश शिंदे, सुशांत चिले. सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.