SIRची मुदत संपली, मात्र २ कोटी मतदारांचे गणना अर्ज जमा नाहीत; निवडणूक आयोगाची आकडेवारी
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची (SIR) गणना प्रक्रिया सोमवारी (17 ऑगस्ट) अंतिम टप्प्यात पोहोचली. याचसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारीकार्यालयाने सकाळी १० वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार ४९ मतदार आहेत. पैकी ७ कोटी ६९ लाख ५२ हजार २६२ मतदारांचे गणना अर्ज डिजिटाइझ झाले आहेत. ही संख्या एकूण मतदारांच्या ७८.६४ टक्के इतकी आहे. मात्र, तब्बल २ कोटी ७ लाख ९३ हजार ९१६ मतदारांचे म्हणजेच २१.२५ टक्के गणना अर्ज अद्याप जमा झाले नाहीत.
डिजिटाइझ झालेले अर्ज आणि अद्याप जमा न झालेले अर्ज अशी एकत्रित आकडेवारी पाहता ९ कोटी ७७ लाख ४६ हजार १७८ मतदारांचा डेटा ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट झाला आहे. हे प्रमाण एकूण मतदारसंख्येच्या ९९.८९ टक्के आहे. दरम्यान, गणना अर्ज जमा करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती आणि दावे दाखल करण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्हानिहाय आकडेवारी पाहता राज्यातील काही महत्त्वाच्या शहरी भागांमध्ये अद्याप मोठ्या प्रमाणात गणना अर्ज संकलित झालेले नाहीत.
ठाणे: ३८.७७ टक्के अर्ज अद्याप संकलित नाहीत
मुंबई शहरः ३७.५७ टक्के
मुंबई उपनगरः ३४.४८ टक्के
पुणेः ३१.९२ टक्के
नागपूरः ३०.३२ टक्के
पालघरः २८.८८ टक्के
याउलट काही जिल्ह्यांमध्ये गणना अर्ज संकलनाचे प्रमाण ९० टक्क्यांच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक आहे.
हिंगोली: ९१.१८ टक्के
बुलढाणाः ९०.८३ टक्के
लातूर: ८९.२१ टक्के
यावरून ग्रामीण भागातील काही जिल्ह्यांमध्ये अर्ज संकलनाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे दिसून येते.
SIRची गणना अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रारूप यादीवर मतदारांना दावे आणि हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे. २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर आवश्यक पडताळणी आणि कार्यवाही पूर्ण करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारूप मतदार यादीत पात्र मतदाराचे नाव आढळले नाही, तर २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत फॉर्म ६ भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल. तसेच १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही या कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
प्रारूप मतदार यादी- २४ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६
१८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांसाठी अर्ज -२३ सप्टेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी-२७ ऑक्टोबर २०२६
मतदार यादीमध्ये आपले नाव योग्य पद्धतीने नोंदलेले आहे की नाही, याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. गणना अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास संबंधित मतदारांनी अधिकृत निवडणूक यंत्रणेकडून आपल्या नोंदीची स्थिती तपासणे आवश्यक ठरू शकते.
एकूणच, SIRच्या गणना प्रक्रियेचा टप्पा अंतिम झाला असला तरी २ कोटी ७ लाखांहून अधिक मतदारांचे गणना अर्ज संकलित झालेले नसल्याची आकडेवारी महत्त्वाची ठरली आहे. आता २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.