केतन अग्रवाल हत्या प्रकरणात 79 दिवसांनी मोठी अपडेट, चेतनच्या बालपणीच्या मित्राला केली अटक
पुणे : खरा पंचनामा
फक्त राज्यच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या केतन अग्रवाल प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती आरोपींच्या तपासात पुढे येत होती. अशामध्ये आता या प्रकरणात तब्बल 79 दिवसांनी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणात केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तीचा प्रियकर चेतन चौधरीला अटक केली होती. आता शनिवारी (5 सप्टेंबर) चेतनच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता चौकशी आणखी कोणती माहिती समोर येणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल हत्या प्रकरणी चेतन चौधरीचा लहानपणीचा मित्र रितेश हिंगेला अटक करण्यात आली आहे. यानंतर या प्रकरणात आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. रितेशला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान चेतन चौधरी आणि रितेश हिंगे या दोघांमधील व्हॉट्सअॅप संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती देण्यात येत आहे. रितेशने त्याच्या फोनमधील या दोघांचे संभाषण डिलीट केले होते. पण, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून डिलीट केलेले चॅट रिकव्हर केले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई केली.
चेतन आणि रितेशच्या संभाषणातून केतनच्या हत्येच्या कटाबाबत रितेशला काही माहिती होती का? याचा तपास पोलिसांनी सुरू केला. पोलिसांच्या तपासानुसार, 18 जून रोजी चेतन आणि सियाने रितेशलाही लोहगडावर सोबत येण्यास सांगितले होते. पण, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर लोहगडावर नेमके काय घडले? याची माहिती त्याला होती का? तसेच, हत्येनंतर आरोपींशी त्याचा नेमका किती संपर्क होता? याचा तपास आता केला जात आहे. हत्येनंतरही रितेशचा चेतन आणि सियासोबत संपर्क असल्याचे तपासामध्ये समोर आले आहे. त्यामुळे हत्येआधी तसेच हत्येनंतर झालेल्या संभाषणांचा तपास पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, रितेश हिंगे हा चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत काम करतो. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येच्या कटाबाबत रितेशला काही माहिती होती. पण, त्याने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला नाही असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत पोलीस काय सांगतात? याकडे आता लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.