"मी मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही", नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "मला लाज वाटते की..."
पणजी : खरा पंचनामा
मुंबई गोवा महामार्गाचे ९० टक्के काम पुर्ण झाले असल्याचा दावा यंत्रणांकडून केला जात असला तरी, महामार्गावरील पूलांची आणि बाह्यवळण मार्गांच्या कामे अजूनही अपूर्ण आहेत.
त्यामुळे यंदाही गणेशभक्त्यांच्या कोकणतील वाटेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरी यांनी आता खेद व्यक्त केला आहे. ते गोव्यात पोरवोरिम सहा-पदरी उड्डाणपूलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
मुंबई गोवा महामार्ग व्हायला थोडा उशीरच झाला, असं नितीन गडकरी यांनी मान्य केलंय. याबाबत ते म्हणाले, 'मुंबईतून गोव्यात येण्याकरता मुंबई-गोवा महामार्गात कोकणाचाही भाग आहे. माझ्या दृष्टीने थोडी दृर्भाग्याची गोष्ट आहे. पण मुंबई-गोवा महामार्ग व्हायला उशीर झाला.'
मुंबई गोवा महामार्ग अनेक कंत्राटदारांमुळे रखडला असा दावा सातत्याने सरकारकडून केला जातोय. तर, या महामार्गासाठी असलेले भूसंपादनच झाले नव्हते असा दावा प्रशासनाकडून केला जातोय. यावर नितीन गडकरी म्हणाले, 'मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अनेक कंत्राटदार अपयशी ठरले आहेत. जगात सात रेकॉर्ड्स झाले आहेत. आता मला आठवा रेकॉर्ड करायचा आहे की वर्षभरात जास्तीत कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टेड करणं आणि अधिकाऱ्यांना निलंबित करणं.'
दरम्यान, गेल्या १५ हून अधिक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाविषयी आता नितीन गडकरी यांनाही लाज वाटू लागली आहे. याबाबत त्यांनीच कबुली दिली. ते म्हणाले की, ' येणाऱ्या काळात मुंबई गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला मी येणार नाही, मला लाज वाटते की इतका उशीर झाला आहे.'
'कालच बैठक झाली असून मुंबई गोवा महामार्ग ९३-९४ टक्के पूर्ण झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबई विमानतळावर उतरून गाडीने मुंबई-गोवा महामार्गाने गोव्याने रस्त्याने येणार आहे आणि महामार्ग व्यवस्थित झाला आहे की नाही ते पाहणार आहे', असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या दरम्यानच्या चौपदरीकरणाला २०११ मध्ये सुरवात झाली होती. तर इंदापूर ते झाराप दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील काम हे २०१४ मध्ये सुरु झाले होते. ही दोन्ही कामे दोन वर्षात पुर्ण होणे अपेक्षित होते. मात्र भुसंपादनातील अडसर, पर्यावरण विषयक मंजूऱ्या, ठेकेदारांची निष्क्रीयता या आणि इतर कारणांमुळे हे काम रखडत गेले. २०२६ च्या उत्तरार्ध सुरू झाला तरी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही.
महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडली आहेत. चिपळुण येथील उड्डाण पुलाचे कामही अपूर्ण आहे. नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याने हा पूल सध्या वाहतूकीसाठी बंद आहे. पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून किमान एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असला तरी पुलाच्या संरचना आणि सक्षमता चाचणीनंतरच या पुलावरील वाहतूक सुरू करायची अथवा नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.