Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेतील कुख्यात रितेश कुरणे टोळी दोन वर्षांसाठी हद्दपारगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठी कारवाई

मिरजेतील कुख्यात रितेश कुरणे टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठी कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक कायदेशीर पावले उचलली आहेत. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे टोळीवर सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मोठी कारवाई करत या टोळीला सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश दिले आहेत.

या तडीपारीच्या कारवाईमध्ये २४ वर्षीय टोळीप्रमुख अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे (रा. जनवाडे प्लॉट, माणिकनगर, मिरज) याच्यासह २४ वर्षीय टोळी सदस्य राहील राजू शेख (रा. समतानगर, मिरज), २८ वर्षीय राजेश चंदू गुजराती (रा. माणिकनगर, मिरज) आणि २८ वर्षीय लतीफ ख्वॉजा शेख (रा. गंगानगर, मिरज) या चारही सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. या टोळीवर सन २०२२ ते २०२६ या कालावधीत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर पिस्तूल वापरणे, चाकूचा धाक दाखवून अपहरण व खंडणी वसूल करणे, घातक हत्यारे बाळगणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे तसेच इलेक्ट्रॉनिक ॲपच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणे यांसारखे शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग यांनी केलेल्या सखोल चौकशी अहवालानंतर आणि दोन्ही बाजूंच्या सुनावणीअंती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी टोळीला २ वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली असून आगामी गणेशोत्सवाच्या काळात अशा गुन्हेगारी टोळ्यांवर कडक नजर ठेवून कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.