'ईडी'च्या नोटिसांवरून जरांगे पाटील आक्रमक; टपोरे-टपोरे सोडले, फडणवीसांवर गंभीर आरोप
जालना : खरा पंचनामा
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'ईडी'च्या नोटिसांचा मुद्दा तापला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तींना ईडीच्या नोटिसा दिल्या जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मला आता संशय यायला लागला आहे. माझ्या आजूबाजूच्या जवळच्यांना 'ईडी'च्या नोटिसा द्यायला लावल्या आहेत. हा काय प्रकार आहे?
'ईडी'च्या (ED) कारवाईवरही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केला. 'ईडी'ला एक स्टेटस आहे. तुम्ही एक सिम्बॉलिक आहात. अंतरवालीच्या लोकांची 'ईडी'ने चौकशी केल्यानंतर 'ईडी'ची किंमत काय राहिली? असा सवाल त्यांनी केला. देशभरातील मोठ्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करून अंतरवालीतील लोकांची चौकशी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींवर दबाव आणण्यासाठी 'ईडी'च्या नोटिसांचा वापर केला जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला. माझ्याबरोबर काम करतात म्हणून फडणवीसांनी कुणालातरी हाताखाली धरायचे आणि आंदोलनाला सपोर्ट करू नये म्हणून ईडीच्या नोटिसा द्यायच्या. याचा अर्थ यांना आंदोलन बंद पाडायचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मराठा समाजालाही पुन्हा आंदोलनाच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.
'ईडी'च्या नोटिसा मिळालेल्या व्यक्तींशी आपली चर्चा झाल्याचे जरांगे यांनी सांगितले. 'ईडी'च्या नोटिसा आलेल्यांनी आताच पदाला लाथ मारली आहे. त्यांच्याजवळ काहीच नाही. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, असा निरोप घेऊन ते माझ्याकडे आले आहेत, असा दावा त्यांनी केला. नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तींकडे संबंधित व्यवहारांचा हिशोब असून तो तयार ठेवण्यात आला आहे आणि तो सादरही केल्याचे जरांगे यांनी सांगितले.
आपल्यासोबत राज्यात मोठ्या संख्येने तरुण काम करत असल्याचे सांगत जरांगे यांनी फडणवीस सरकारला सूचक इशारा दिला. माझ्याबरोबर राज्यात दहा हजारांहून अधिक मुलं काम करतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले, तर जेल नाही, नाही गेलो तर जेल, याचा अर्थ हे खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करू शकतात. पण त्यांनी एक लक्षात ठेवावे. त्यांच्या देखील पाहुणे असणार आहेत. आमची पोरं देखील तक्रारी 'ईडी'कडे करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
आपल्या समर्थकांकडून 'ईडी'कडे करण्यात आलेल्या तक्रारींचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली. ईडीला दोन्हीचा सामना करायचा आहे. आम्ही दिलेल्या अर्जाच्या चौकशा नाही करायच्या का? आम्ही देखील हुक लावणार आहोत. दुसऱ्यांना वेदना देता ना, मग तुम्ही पण त्या वेदना सहन करायला तयार राहा, असे ते म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगे यांनी निशाणा साधला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपल्यावर लक्ष ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आमच्यावर लक्ष ठेवता, आम्ही देखील अर्ज-भानगडी करणार आहोत. कसे गुन्हे दाखल होत नाहीत, चौकशी कशी होत नाही, हेच पाहतो. बावनकुळे आणि भुजबळांचे हे कारस्थान आहे. हे देखील हाणून पाडू, असा इशारा जरांगे यांनी दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.