सीबीआयची मोठी कारवाई; एक कोटींच्या लाचप्रकरणी CGST अधीक्षकासह सल्लागाराला अटक
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सीबीआयने (CBI) एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) व केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तालयातील अधीक्षकासह एका सल्लागाराला अटक केली आहे.
रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथील एका खासगी रिअल्टी कंपनीच्या प्रकल्प प्रमुखाने केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल करून ही कारवाई केली.
तक्रारीनुसार, संबंधित कंपनी नवी मुंबईतील नवीन पनवेलच्या सेक्टर १७ मधील दोन इमारतींच्या पुनर्विकासाचे काम करत आहे. यामध्ये सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, रायगड आयुक्तालयाच्या मालकीच्या २४ फ्लॅट्सचा समावेश आहे. या फ्लॅट्सच्या पुनर्विकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यासाठी आणि फ्लॅट्स ताब्यात देण्यासाठी अधीक्षक पंकज कुमार यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता.
सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या पडताळणीदरम्यान आरोपी अधिकाऱ्याने १० सप्टेंबरला १० लाख रुपये रोख मागितले होते. तसेच, त्याने खरेदी केलेल्या फ्लॅटचे डाउन पेमेंट म्हणून २० लाख रुपये आणि नवी दिल्लीतील डीजी एचआरडी सीजीएसटीच्या (DG HRD CGST) इतर अधिकाऱ्यांसाठी ७० लाख रुपये नंतर देण्याची मागणी केली होती.
गुरुवारी सीबीआयने सापळा रचला. यावेळी अधीक्षक पंकज कुमार यांनी तक्रारदाराला १० लाखांची लाच तिथे उपस्थित असलेल्या प्रसाद कुमार स्वामी या सीजीएसटी सल्लागाराकडे देण्यास सांगितले. त्यानंतर सीबीआयने गुरुवारी दोन्ही आरोपींना अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.