मिरजेतील विनायक ढंग टोळी दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
आगामी गणेशोत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सांगली पोलीस दलाने गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक बबन ढंग याच्यासह त्याच्या टोळीतील पाच जणांना संपूर्ण सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ मधील तरतुदींनुसार हे हद्दपारीचे आदेश पारित केले असून या कारवाईमुळे मिरज परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या टोळीमध्ये टोळीप्रमुख विनायक बबन ढंग (वय १९, रा. लक्ष्मी मंदिराच्या मागे, गणेश तलाव, मिरज), रोहित राजू घोडके उर्फ गोसावी (वय २६), अरुण शंकर घोडके उर्फ गोसावी (वय १९), करण राजू घोडके उर्फ गोसावी (वय २९, तिघेही रा. गोसावी गल्ली, मिरज) आणि अथर्व अभिजित माने (वय १९, रा. गणेश तलाव, मिरज) यांचा समावेश आहे. या टोळीविरुद्ध सन २०२२ ते २०२६ या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर गृहअतिक्रमण करणे, घातक हत्यारांनी गंभीर दुखापत करून जिवे मारण्याची धमकी देणे, वाहनांची तोडफोड करून नुकसान करणे, सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे यांसारखे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा वारंवार भंग करणाऱ्या आणि कायद्याचा कोणताही धाक न बाळगणाऱ्या या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी करून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा व अजय कोकाटे यांनी सादर केलेला अहवाल, टोळीच्या हालचाली आणि गुन्ह्यांची सद्यस्थिती विचारात घेऊन नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार ही कठोर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मिरज शहर पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली असून, सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर अशीच कडक नजर ठेवून त्यांचे उच्चाटन केले जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.