मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांना काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला
मुंबई : खरा पंचनामा
अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची (अ, ब, क, ड) मागणी प्रलंबित राहिल्यामुळे मातंग समाजाकडून मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन आझाद मैदानावर होणार होते. मात्र, पोलिसांना गाफील ठेवून मातंग मोर्चातील आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाच्या परिसरात रस्त्यावर उतरून येथील वाहतूक पूर्णपणे बंद करुन टाकली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. याठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा असूनही मातंग मोर्चातील आंदोलकांनी सीएसएमटी परिसरा, बीएमसी मुख्यालयाचा परिसर व्यापून टाकला. त्यामुळे आता मंत्रालयाकडे जाणारी वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. सध्या मातंग मोर्चातील आंदोलकांना रस्त्यावरुन दूर करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हे आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नाहीत. अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासन निर्णय झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, अशी ठाम भूमिका मातंग आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता पोलीस हे आंदोलन कशाप्रकारे हाताळणार, हे पाहावे लागेल.
आझाद मैदान परिसरात मातंग समाजाकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आझाद मैदानाऐवजी हे आंदोलक सीएसएमटी स्थानक, मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आणि सेल्फी पॉईंट अशा सर्व ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे येथील चौकात प्रचंड गर्दी झाली आहे. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढली जात आहे. तुम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी आहे. त्यामुळे इथून बाजूला व्हा, अशी विनवणी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, मातंग समाजाचे काही आंदोलक रस्त्यावर झोपले आहेत. ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही आंदोलक हे बेस्टच्या बसवर चढले आहेत. या सगळ्यामुळे सीएसएमटी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
माजी आमदार रमेश कदम हे आज मुंबईतील मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र, त्यापूर्वीच कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून सकाळी सात वाजता रमेश कदम यांना स्थानबद्ध करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या मोर्चाला जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. या कारवाईमुळे मातंग समाजात तीव्र असंतोष पसरला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.