Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत ७ गुन्ह्यांतील फरारी सराईत गुंड 'मुक्या' पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात;६ लाखांचे दागिने जप्त

सांगलीत ७ गुन्ह्यांतील फरारी सराईत गुंड 'मुक्या' पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात;
६ लाखांचे दागिने जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील आष्टा-नागाव रस्त्यावर दरोडा व घरफोडीच्या गुन्ह्यांमधील फरारी आणि सराईत गुन्हेगार विशाल उर्फ मुक्या भीमराव पवार (वय ३५, रा. बहादूरवाडी, ता. वाळवा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून ६ लाख २ हजार ७६० रुपये किमतीचे सुमारे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नक्षीदार दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला आष्टा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक आष्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार संकेत कानडे, अभिजित माळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत आरोपी मुक्या पवार हा चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी आष्टा ते नागाव रस्त्यावरील सह्याद्री मल्टीपर्पज लॉन्ससमोर थांबला होता. पोलिसांनी तातडीने परिसरात सापळा रचून त्याला पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेतले.

त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता पॅन्टच्या खिशात सोन्याच्या दोन नक्षीदार बांगड्या मिळून आल्या. पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने वर्षभरापूर्वी गोपी उर्फ टावटाव काळे, लेंग्या उर्फ टायल काळे, करण उर्फ कर्जा शिंदे आणि गदग काळे या साथीदारांसह मर्दवाडी येथील एका घराची कौले काढून तिजोरी फोडून चोरी केल्याची कबुली दिली. या घरफोडीत मिळालेल्या वाटणीतील बांगड्या तो विक्री करण्यासाठी घेऊन आला होता.

पकडण्यात आलेला आरोपी मुक्या पवार हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मोक्कांतर्गत दोन वेळा कारवाई करण्यात आली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत दरोड्या सह खून, जबरी चोरी व घरफोडीसारखे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तसेच पलूस, आष्टा, कुरळप आणि कुंडल पोलीस ठाण्यांतील ७ गंभीर गुन्ह्यांमध्ये तो दीर्घकाळापासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमित परीट, अमोल पैदाळे, रणजीत जाधव, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, रोहन घस्ते, केरुबा चव्हाण, सुरज थोरात, विनायक सनदी, सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.