दिशा सालियान प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब बदलले? नवीन वळण येण्याची शक्यता, पेनड्राईव्हमधील पुराव्यांचं गूढ वाढलं
मुंबई : खरा पंचनामा
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्य आहेत. दिशा सालियान याचे वडील सतीश सालियान यांनी या प्रकरणात राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप करत पुरावे असल्याचं म्हटलं होतं.
आता त्यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कार्यालयात जाऊन तपास अधिकाऱ्यांना एक पेनड्राईव्ह सुपूर्द केली आहे. या पेनड्राईव्हमध्ये घटनेच्या वेळच्या तीन व्हिडिओ क्लिप्स आणि दोन कथित प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब असल्याचा दावा वकील नीलेश ओझा यांनी केला आहे.
वकील नीलेश ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेनड्राईव्हमधील पुराव्यांच्या आधारे दिशा सालियान प्रकरणातील कथित प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नावेद मुजावर याच्या जबाबावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नावेद मुजावर यानं आधी पोलिसांना दिलेल्या जबाबात स्वतःला घटनास्थळी (मलाड इथल्या 'रीजनंट गॅलक्सी' इमारत) उपस्थित असल्याचं सांगितलं होतं आणि दिशाला १४ व्या मजल्यावरून खाली पडताना पाहिल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर समोर आलेल्या व्हिडिओ वक्तव्यात त्याच्या बोलण्यात, घटना घडलेल्या वेळेत आणि दिशाच्या कपड्यांच्या वर्णनात मोठा विरोधाभास दिसून आला आहे.
या नवीन जबाबांमध्ये आदित्य ठाकरेयांच्यासह काही इतर व्यक्तींच्या कथित भूमिकेबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसंच, सुरुवातीला पोलिसांनी पुरावे दाबण्याचा किंवा प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला, असा दावाही करण्यात आला आहे.
दिशाच्या पडण्याची वेळ ही रात्री साधारण १:२० वाजताची सांगितली गेली होती; मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस १२:५० वाजताच घटनास्थळी दिसून येत असल्याचा दावा वकिलांनी केला आहे.
या प्रकरणात समोर आलेल्या महत्त्वाच्या साक्षीदारांना आणि संबंधित व्यक्तींना धमक्या येत असल्याचा आरोप करत चार जणांसाठी पोलीस सुरक्षेची मागणी CBI कडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. यात समीर वानखेडे, सतीश सालियान, आशुतोष पाठक आणि वकील नीलेश ओझा यांच्या नावांचा समावेश आहे.
हायकोर्टाच्या आदेशानुसार पुरावे उपलब्ध करून दिल्यानंतर पुढील कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या पेनड्राईव्हची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करावी, संशयितांना त्वरित अटक करण्यात यावी आणि गरज पडल्यास त्यांच्याविरोधात 'लुकआउट नोटीस' व वॉरंट जारी करावं, अशी मागणी वकील ओझा यांनी केली आहे.
दरम्यान, या पेनड्राईव्हमधील व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या वक्तव्यांमधील विरोधाभासाची सखोल चौकशी आता CBI कडून केली जाणार असल्याचंही म्हटलं जातंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.