Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

खळखट्याकच्या इशाऱ्याने अखेर माघार; नरेंद्र मेहता यांच्या शाळेने कांदा-लसूण बंदीचा निर्णय घेतला मागे

खळखट्याकच्या इशाऱ्याने अखेर माघार; नरेंद्र मेहता यांच्या शाळेने कांदा-लसूण बंदीचा निर्णय घेतला मागे

मुंबई : खरा पंचनामा 

मिरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकॅडमीतील विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, या सूचनेवरून गेल्या दोन दिवसांपासून वाद निर्माण झाला होता.

पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर शाळेने पालकांना ही सूचना केली होती. मात्र, विविध संघटनांनी याला आक्षेप घेतल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आक्रमक भूमिका घेत शाळेच्या निर्णयाला विरोध केला.

शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सअॅप तसेच पोर्टल ग्रुपवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे जमिनीखाली उगवणारे पदार्थ आणू नयेत, अशी सूचना करण्यात आली होती. याशिवाय पर्युषण काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही या पदार्थांचा वापर केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या निवडीवर शाळेकडून निर्बंध घातले जात असल्याची चर्चा सुरू झाली.

या निर्णयावर मनसेसह मराठी एकीकरण समितीनेही तीव्र आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांनी काय खावे आणि काय खाऊ नये, हे धार्मिक कारणांवरून शाळेने ठरवणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. मनसेने या निर्णयाविरोधात आंदोलनही केले. शाळेच्या प्रवेशद्वारावर कांदा-लसूणच्या माळा घेऊन आंदोलन करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, या वादावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. पर्युषण पर्व हा पवित्र काळ असून प्राणीहिंसा टाळावी, या भावनेतून पालकांना केवळ विनंती करण्यात आली होती. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही, असे मेहता यांनी सांगितले होते. या विषयाला विनाकारण राजकीय रंग देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती.

मात्र, विरोध वाढत गेल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शाळा प्रशासनावर निर्णयाचा फेरविचार करण्याची वेळ आली. धार्मिक भावना आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आहाराच्या स्वातंत्र्याचा मुद्दा यामुळे हा वाद मिरा-भाईंदरच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय बनला.

अखेर सेव्हन स्क्वेअर अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ न आणण्याबाबत केलेले आवाहन मागे घेतले आहे. पालकांना पाठवलेला संबंधित संदेशही डिलिट करण्यात आला असून, यापुढे ही सूचना लागू राहणार नाही. मनसेच्या विरोधानंतर आणि वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.