मुख्यमंत्र्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला; फडणवीस गाडीतून उतरले, शेतकऱ्यांना आश्वासन दिलं
कारंजा : खरा पंचनामा
कारंजा परिसरातील म्हसला गावात दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले असता, स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी 'सरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच नुकसान झालेल्या पिकांसाठी आर्थिक मदत द्यावी', अशी मागणी केली.
शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून मुख्यमंत्री फडणवीस गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्जमाफीपासून काही शेतकरी वंचित राहिले असतील, तर त्यांचाही विचार केला जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन कोरड्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय (GR) काढण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत गावातील शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री गावात आल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तर काहींनी दौऱ्यामुळे प्रत्यक्ष परिस्थितीत कोणताही बदल होणार नसल्याची नाराजी व्यक्त केली.
एका शेतकऱ्याने कर्जमाफीच्या प्रक्रियेवर आक्षेप घेताना बँकांकडून कर्जमाफीसाठी सीबील स्कोअरची मागणी केली जात असल्याचा दावा केला. अनेक शेतकऱ्यांचा सीबील स्कोअर खराब असल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नसेल, तर ही कर्जमाफी कागदावरच राहते, अशी नाराजी त्याने व्यक्त केली.
म्हसला परिसरात गेल्या 60 दिवसांपासून पुरेसा पाऊस झालेला नसल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला. पावसाअभावी पिके वाळून गेली असून, उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमाही काढलेला नसल्याने नुकसान झाल्यानंतर आर्थिक मदत कशी मिळणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपल्या समस्या मांडता आल्या नाहीत, अशी तक्रारही काही शेतकऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी आले होते. मात्र, स्थानिक नेते आणि पदाधिकारीच पुढे राहिल्याने आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही, असा आरोप काही शेतकऱ्यांनी केला.
पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी एकरी किमान 20 हजार रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली. तर काही शेतकऱ्यांनी नुकसानाची तीव्रता लक्षात घेता एकरी 50 हजार रुपयांपर्यंत मदत मिळावी, अशी मागणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याबाबत आश्वासन दिले. तसेच कोरड्या दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय काढण्याची कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता सरकारकडून प्रत्यक्षात कोणते निर्णय घेतले जातात आणि शेतकऱ्यांना किती मदत मिळते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.