निम्म्या राज्यात आज वादळी पावसाचा 'यलो अलर्ट'; कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढणार ?
मुंबई : खरा पंचनामा
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून हंगाम संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. सध्या राज्यातील काही भागात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव आहे.
त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होत आहे. यात मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांसह कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे. दरम्यान, आजही निम्म्या राज्यात वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' हवामान विभागाने दिला आहे. तसेच गुरुवारी राज्यातील काही भागात वादळी पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ऑगस्टमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमीच राहिले, त्यामुळे जून महिन्यापासून राज्याच्या अनेक भागात असणारी पावसाची तूट आणखी वाढली. मान्सूनचा हंगाम संपण्यास काही दिवसच शिल्लक असताना सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे राज्यात दिलासादायक पावसाची आशा निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील काही भागात पावसाची नोंद होत असली तरीही सर्वदूर पावसाचा अभाव आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवरून पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे क्षेत्र छत्तीसगडमधून पुढे सरकण्याची शक्यता असून या हवामान प्रणालीचा विदर्भात सर्वाधिक प्रभाव राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त आहे. सध्या राज्यातील काही ठिकाणी पावसाची नोंद होत असली तरीही राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव आहे. दरम्यान, बुधवारी पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून गुरुवारी कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुरुवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वायव्य दिशेला सरकण्याचा अंदाज आहे. मात्र, हे क्षेत्र पश्चिम दिशेने पुढे सरकल्यास राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. तसे झाल्यास मान्सूनचा हंगाम संपण्याआधी दुष्काळसदृश्य स्थिती असणाऱ्या बहुतांश जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळेल.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागात आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.