सांगलीतील मिठाई दुकान घरफोडी प्रकरणाचा धडक उलगडा
कर्नाटकातील दोन सराईत चोरटे गजाआड, ४९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त : एलसीबीची कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहरातील १०० फुटी रोडवरील एका मिठाईच्या दुकानात झालेल्या धाडसी घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईदरम्यान कर्नाटक राज्यातील धारवाड भागातील दोन आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून घरफोडीतील ४९ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला त्यांचा तिसरा साथीदार सध्या पसार असून पोलीस त्याचा तीव्र शोध घेत आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री १:०४ ते १:२२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १०० फुटी रोडवरील कृष्णाई निवास, माने चौक येथील तक्रारदार योगेश सुरेश चव्हाण यांच्या मिठाईच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम पळवून नेली होती. या प्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी १८:४० वाजता विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१(४) व ३(४) अन्वये (गुन्हा रजि. नं. २५१/२०२६) गुन्हा नोंदवण्यात आला होता. सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले. तपास सुरू असताना ३ सप्टेंबर २०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार सुमित सूर्यवंशी आणि विनायक सुतार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची टीप मिळाली. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिठाईचे दुकान फोडणारे कर्नाटकातील सराईत आरोपी बाबाजान सोनशी व विनोद किरिगी हे चोरीच्या पैशांसह मिरज रेल्वे स्टेशनजवळील खॉजा वस्ती परिसरात आले असल्याची बातमी मिळाली.
बातमीची खातरजमा होताच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने खॉजा वस्ती येथील उर्दू शाळा क्रमांक २ च्या परिसरात तातडीने सापळा रचला. समतानगर ते कोल्हापूर चाळ डांबरी रस्त्यावर दोन संशयित तरुण थांबलेले दिसताच पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची कोणतीही संधी न देता जागीच ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या संशयितांची विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे बाबाजान मेहबूबसाब सोनशी (वय २७, रा. जयानगर, धारवाड) आणि विनोद धुंडाप्पा किरिगी (वय २६, रा. हौसाल्लापूर, धारवाड) अशी असल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष संशयितांची अंगझडती घेतली असता बाबाजान सोनशी याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ५०० रुपये दराच्या ५१ नोटा आणि विनोद किरिगी याच्या डाव्या खिशात ५०० रुपये दराच्या ४८ नोटा अशा एकूण ९९ भारतीय चलनी नोटा (४९,५०० रुपये) मिळून आल्या. पोलिसी खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला फरार साथीदार मंजुनाथ अर्जुन हुल्लूर (रा. धारवाड) याच्या मदतीने १०० फुटी रोडवरील मिठाईचे दुकान फोडल्याची आणि चोरीच्या रकमेची आपापसात वाटणी केल्याची कबुली दिली.
हे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही कर्नाटक राज्यात मालमत्तेसंबंधी विविध गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींसह जप्त केलेली रोकड पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केली आहे.
या धाडसी कारवाईत पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, राजाराम मुळे, अतुल माने, सुशील मस्के, सुनीता शेजाळे, प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर व सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.