शासकीय निधीचा अपहार: ६ महिन्यांपासून फरार महिला तलाठी अखेर राहुरी पोलिसांत हजर; अटक
अहिल्यानगर : खरा पंचनामा
शासकीय निधीचा अपहार करून गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या माहेगाव येथील महिला तलाठी मंगल रामचंद्र दुशिंगे यांनी अखेर राहुरी पोलीस ठाण्यात स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली.
अनुदान वाटपात नियमाबाह्य अपहार
मंगल दुशिंगे माहेगाव (ता. राहुरी) येथे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सन २०२२ ते २०२३ या कालावधीत मदत व सानुग्रह अनुदानाच्या वाटपात नियमाबाह्य पद्धतीने ३ लाख ६५ हजार ३४० रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाले होते. या अहवालानंतर एप्रिल २०२६ मध्ये मंडल अधिकारी विजय बेरड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून दुशिंगे या पोलिसांना चकवा देत फरार होत्या.
जालना जिल्ह्यातही १२ लाखांचा गैरव्यवहार
तपासादरम्यान दुशिंगे यांनी जालना जिल्ह्यातही काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून तब्बल १२ लाख २४ हजार ८०२ रुपयांचा शासकीय निधी लाटल्याचे समोर आले आहे. यामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी वाढली आहे. या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.