Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आरग येथील घरफोडी प्रकरणाचा मिरज ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाशजावेनेच चोरलेले ३.२२ लाखांचे सोने जप्त

आरग येथील घरफोडी प्रकरणाचा मिरज ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश
जावेनेच चोरलेले ३.२२ लाखांचे सोने जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे घडलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात मिरज ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादीच्या स्वतःच्याच जावेने (भावाच्या पत्नीने) सासरच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लांबवले होते. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चोरीस गेलेला ३ लाख २२ हजार १२५ रुपये किमतीचा ४.२९ तोळे वजनाचा संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकाकडे सुपूर्द केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरग येथील रहिवासी गुंडाप्पा मोतीराम कोरे (वय ४४) यांच्या आई-वडिलांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना १३ ऑगस्ट २०२६ च्या रात्री घडली होती. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडीच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे व पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तैनात करण्यात आले होते.

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय फिर्यादीच्या भावाची पत्नी संपदा सुहास कोरे (वय ३५, रा. भोसले मळा, आरग) हिच्याकडे वळला. महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वाकळे आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील यांनी संशयित संपदा हिची चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळली. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने घरफोडीची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी संपदा कोरे हिला अटक करून तिच्याकडून १.५ तोळ्याचा लक्ष्मी हार, १ तोळ्याची मोहन माळ, कानातील फुले-झुबे, बोरमाळ आणि अंगठी असा एकूण ४.२९ तोळे सोन्याचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व मुद्देमाल फिर्यादीची आई सौ. मंगल मोतीराम कोरे यांच्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.