Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात गणपती विसर्जनाला गालबोट, मिरवणुकीत रक्तरंजित राडा, तिघांकडून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

कोल्हापुरात गणपती विसर्जनाला गालबोट, मिरवणुकीत रक्तरंजित राडा, तिघांकडून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

कोल्हापूर : खरा पंचनामा 

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दारात फटाके का वाजवले, या क्षुल्लक कारणावरून तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मानेवाडी गावात घडली आहे.

या हल्ल्यात २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचारादरम्यान ६ टाके पडले आहेत. सुदैवाने तो या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडी गावात विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहात सुरू होती. मिरवणूक एका घरासमोरून जात असताना कार्यकर्त्यांनी तेथे फटाक्यांची माळ पेटवली. यावरून संतप्त झालेल्या संग्रामसिंह दत्तात्रय माने, रणजीत दत्तात्रय माने आणि दत्तात्रय कृष्णा माने या तिघांनी "आमच्या घराच्या दारात फटाक्यांची माळ कोणी लावली?" असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

संतापलेल्या या तिघांनी तेथील एका २२ वर्षीय तरुणाला पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य पाहून गणेश मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी पुढे येत तिघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या या तिघांनी कोणाचंही न ऐकता थेट कोयता काढून तरुणावर हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मिरवणुकीत एकच खळबळ उडाली.

या प्राणघातक हल्ल्यात तरुणाच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्याच्यावर ६ टाके घालावे लागले. या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात आरोपी संग्रामसिंह माने, रणजीत माने आणि दत्तात्रय माने या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, यातील मुख्य हल्लेखोर संग्रामसिंह माने हा सरकारी नोकरदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे हिंसक कृत्य केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.