दिशा सालियन प्रकरण; तपासाची धुरा डॅशिंग महिला अधिकाऱ्याच्या हाती, सीमा पाहुजा कोण?
मुंबई : खरा पंचनामा
दिशा सालियन मृत्यू प्रकरण तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात FIR दाखल केल्याने आता तपासाला वेग आला आहे. आता या तपासाची जबाबदारी CBIच्या वरिष्ठ अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आता हे प्रकरण लवकर मार्गी लागेल अशी शक्यता असून या प्रकरणाला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. या प्रकरणाला ६ वर्षांचा काळ लोटल्याने सीमा यांच्यापुढे मोठं आव्हानही असणार आहे. सीमा पाहुजा सध्या CBIच्या दिल्लीतील विशेष गुन्हे विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. संवेदनशील आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांच्या तपासाचा त्यांना अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी हाथरस, उन्नाव आणि कोलकाता येथील आर. जी. कर प्रकरणांसारख्या महत्त्वाच्या तपासांमध्ये काम करण्यात आले आहे.
सीमा पाहुजा यांच्या अनुभवामुळे दिशा सालियन प्रकरणातील विविध पैलूंचा तपास आता अधिक बारकाईने होण्याची शक्यता आहे. CBIकडून यापूर्वी झालेल्या तपासातील नोंदी, कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांची पुन्हा छाननी केली जाऊ शकते.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने CBI तपासाचे आदेश देताना तपासादरम्यान पुरेशा पुराव्याशिवाय कोणालाही आरोपी म्हणून वागवू नये, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे FIRमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव किंवा आरोपांचा उल्लेख असला तरी, त्या व्यक्तीची भूमिका तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारेच निश्चित केली जाणार आहे.
आता CBIचे पथक दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित जुन्या नोंदी, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांची पुन्हा तपासणी करणार आहे. त्यामुळे सहा वर्षांनंतर सुरू झालेल्या या नव्या तपासातून नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालाड परिसरातील एका इमारतीवरून १२ व्या मजल्यावरुन पडून ८ जून २०२० रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली होती. त्यानंतर दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी १४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूत याचा वांद्रे येथील निवासस्थानी मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू एकमेकांशी निगडित असल्याचा दावा करण्यात आला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.