Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार?

महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार?

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे १७ सप्टेंबरपर्यंत देशातील बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी फिरतो. यंदाही मान्सून वेळेत परतेल, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, बदलत्या हवामानामुळे मॉन्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीसह अनेक राज्यांत पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या भागांत वीज पडण्याचा धोकाही व्यक्त करण्यात आला आहे. मध्य प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात देशातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. काही ठिकाणी काही तासांनंतर किंवा एक-दोन दिवसांनी पुन्हा पाऊस झाला. आता ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. १२ आणि १३ सप्टेंबरला देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. १४ सप्टेंबरला काही काळ पावसाची उघडीप मिळेल. त्यानंतर १५ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ११ सप्टेंबरला नाशिक घाट, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे यलो अलर्ट आहे.

१२ सप्टेंबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

१३ सप्टेंबरला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा येथे यलो अलर्ट आहे.

१४ सप्टेंबरला नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यलो अलर्ट असलेल्या भागांत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.