Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुख्यमंत्र्यांच्या घरावर चालवला हातोडा, कारण आलं समोर

मुख्यमंत्र्यांच्या घरावर चालवला हातोडा, कारण आलं समोर

उज्जैन : खरा पंचनामा 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या घरावर हातोडा चालवल्याची बातमी समोर आली आहे. उज्जैनमध्ये सिंहस्थ महापर्व २०२८ च्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते रुंदीकरणाच्या कामांसाठी यादव यांचं घर तोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान आज त्यांनी स्वतः घरावर पहिला हातोडा मारला आणि कामाची सुरुवात करण्यात आली.

मिळलेल्या माहितीनुसार, सिंहस्थ महापर्वादरम्यान उज्जैनमध्ये लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांचा विकास केला जात आहे. खजूर वाली मस्जिद ते अब्दालपुरा, जीवाजीगंज पोलीस ठाणे मार्गे गणेश चौकापर्यंतचा सुमारे ७३० मीटर लांबीचा रस्ता १५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाकडून सुमारे ९ कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्ते रुंदीकरणामुळे एकूण २७२ घरांवर हातोडा फिरवला जाणार आहे.

महापालिकेकडून रस्त्याची मोजणी, रस्त्याची हद्द आणि जी घरे तोडली जाणार त्या घरांच्या घरमालकांना नियमानुसार नोटिसा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शनिवारी काही घरांवरील लाल निशाण असलेले भाग हटवण्यात आले. त्यानंतर काही नागरिकांनी स्वतःहून आपली घरे खाली करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे, रस्ते रुंदीकरणासाठी निश्चित केलेल्या भागातील २७२ घरांमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या पैतृक घराचाही समावेश आहे. दरम्यान आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री मोहन यादव स्वतः अब्दालपुरा येथे पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्या पैतृक घरासमोर पूजा करून रस्ते रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करून दिली. त्यानंतर त्यांनी स्वतः हातात हातोडा घेत घराचा काही भाग पाडण्यास सुरुवात केली. यावेळी महापालिका अधिकारी, पोलीस, माध्यमांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक नागरिक विनोद राठोड आणि रविंद्र कुमार राठोड यांनीही विकासकामाला सहकार्य करत आपलं घर पडण्यास सुरुवात केली. शहराच्या विकासासाठी सहकार्य करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिका आयुक्त अभिलाष मिश्रा यांनी शनिवारी प्रस्तावित मार्गाची पाहणी केली. नागरिकांना आवश्यक सहकार्य आणि मार्गदर्शन देत काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या रस्ते रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.