पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल !, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; 'आमचा बंद तर सगळ्यांचा बंद'
पुणे : खरा पंचनामा
अलका चौकात डीजे बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचना धुडकावत एका गणेश मंडळाने मोठ्या आवाजात स्पीकर सुरू ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. 'आमचा बंद तर सगळ्यांचा बंद,' असे म्हणत मंडळाच्या पदाधिकाऱ्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शुक्रवारी अनंत चतुर्दशीला पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. लक्ष्मी, कुमठेकर, टिळक आणि केळकर रस्त्यांवरून मिरवणुका अलका चौकात येत होत्या. चौकात डीजेला बंदी असतानाही एका मंडळाने मोठ्या स्पीकरसह प्रवेश केला. पोलिसांनी स्पीकर बंद करण्यास सांगितल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्याने माईकवरून 'आमचा स्पीकर बंद करताय तर आधी सगळ्यांचे स्पीकर बंद करा,' असे सांगितले. त्यानंतर मंडळाने डीजे सुरू केला.
या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी हा प्रकार पाहताना दिसत असून, डीजेच्या आवाजापासून बचावासाठी एका अधिकाऱ्याने कानावर साऊंडप्रुफ हेडफोन लावल्याचेही दिसते.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर ध्वनीची तीव्रता ११५ डेसिबलपर्यंत पोहोचली. २०२५च्या तुलनेत सरासरी ध्वनी पातळीत १२ डेसिबलने वाढ झाली. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या पाहणीनुसार, शुक्रवारी दुपारी चार ते मध्यरात्री बारा या काळात आवाजाची तीव्रता उच्च पातळीवर होती. दुपारी चार वाजता ११३.४, रात्री आठ वाजता १११.९, तर मध्यरात्री बारा वाजता ११२.६ डेसिबल आवाजाची नोंद झाली. विसर्जन मिरवणूक शनिवारी सायंकाळी सहापर्यंत सुरू होती. मिरवणूक लांबल्याने काही ठिकाणी वादावादीचे प्रकारही घडले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.