एकनाथ शिंदेंचा OSD महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी; विश्वासू अधिकाऱ्याला ठाण्यात आणलं !
ठाणे : खरा पंचनामा
ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाच्या अतिरिक्त आयुक्तपदावर डॉ. नितीन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने ४ सप्टेंबर रोजी शासन आदेश काढून राठोड यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यामुळे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर मोठा बदल झाला आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनिष जोशी ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. वरिष्ठ प्रशासकीय पद रिक्त राहिल्याने नव्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष होते. अखेर अवघ्या काही दिवसांत शासनाने डॉ. राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
डॉ. नितीन राठोड हे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-अ अधिकारी असून अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९-अ अंतर्गत त्यांची ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मूळ विभागाकडून कार्यमुक्त झाल्यानंतर ते अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारतील.
दरम्यान, डॉ. राठोड हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या कार्यालयातील विश्वासू अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राठोड यांना ठाणे महापालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात महापालिकेतील निर्णयप्रक्रिया, विकासकामांचा वेग आणि विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर राठोड यांच्या कार्यपद्धतीचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिकेच्या कारभारात अतिरिक्त आयुक्तांची भूमिका केवळ विभागीय समन्वयापुरती मर्यादित नसते. विविध विभागांचे कामकाज, विकास प्रकल्प, नागरी सुविधा, आरोग्य व्यवस्था, पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी यामध्ये अतिरिक्त आयुक्त महत्त्वाची भूमिका बजावतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.