निवृत्तीच्या 2 दिवस आधीच मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांना अटक; स्वीय सहायक, लेखापालही एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : खरा पंचनामा
मालेगाव महापालिकेतील दोन कामांची बिले ठेकेदारांच्या बँक खात्यांवर जमा करण्याच्या मोबदल्यात 80 हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात महापालिका आयुक्तांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली.
विशेष म्हणजे, आयुक्तांना निवृत्तीच्या 2 दिवस आधीच अटक करण्यात आली आहे. आयुक्त रवींद्र शेषराव जाधव, त्यांचे स्वीय सहायक निलेश वसंत पाटील आणि लेखापाल हरिष नथुराम डिंबर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 'एसीबी' कडून मालेगावमध्ये दोन ठिकाणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ठिकाणी रात्री उशिरापर्यंत झडती घेण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने दोन ठेकेदारांचे प्राधिकारपत्र घेतले होते. या ठेकेदारांनी मालेगाव महापालिकेमार्फत केलेल्या कामांची दोन बिले त्यांच्या बँक खात्यांवर आरटीजीएसद्वारे जमा करण्याच्या मोबदल्यात आयुक्त व संबंधितांनी प्रत्येकी 4 टक्के दराने लाचेची मागणी केली. या दोन्ही बिलांच्या मोबदल्यात एकूण 80 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. 10 आणि 13 जुलै 2026 रोजी आयुक्तांचे स्वीय सहायक निलेश पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन कामांची बिले मंजूर करून देण्यासाठी चार टक्के दराने लाचेची मागणी केली आणि रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. याबाबत आयुक्त रवींद्र जाधव यांना विचारून सांगतो, असे म्हणत त्यांनी मागणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.
आयुक्त रवींद्र जाधव यांनीही 24 जुलै 2026 रोजी दोन्ही कामांची बिले मंजूर करून देण्यासाठी 4 टक्के दराने लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधित ठेकेदारांच्या बँक खात्यांवर बिलांची रक्कम जमा झाल्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. या प्रकरणात महानगरपालिकेतील लेखापाल हरिष डिंबर यांच्यावरही लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. १३ जुलै रोजी स्वीय सहायक निलेश पाटील यांनी केलेल्या मागणीला आणि १५ ऑक्टोबर रोजी आयुक्त रवींद्र जाधव यांनी केलेल्या मागणीला त्यांनी प्रोत्साहन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.