मुंबई : खरा पंचनामा
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. मनोज जरांगे यांच्या या ऑडिओ क्लीपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे-पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व संपवण्याचा कुटील डाव असल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लिपचे तांत्रिक आणि फॉरेन्सिक विश्लेषण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
आता ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपबाबतचा दावा, सुशीलकुमार शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि गोकुळच्या निकालावरून झालेली राजकीय टीका यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफर दिली असण्याची शक्यता पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. मात्र, त्यांनी ही ऑफर स्वीकारली नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
कोल्हापुरातील गोकुळच्या निकालावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. 25-0 असा एकतर्फी निकाल लागेल, या अपेक्षेने मुख्यमंत्री कोल्हापुरात गुलाल खेळण्यासाठी गेले होते. मात्र, कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारल्याची टीका त्यांनी केली. तसेच देशात परिवर्तन अटळ असल्याचा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांना मोठं कुणी केलं आणि आता त्यांनाच बाजूला करण्याचा प्रयत्न का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी प्रयत्न केले. त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मात्र, त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय नेत्यांना आपलं काय होणार, असा प्रश्न पडल्याचा दावा खैरे यांनी केला आहे.
वादग्रस्त ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवा आणि सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं नाव चर्चेत असल्याने त्यांनी स्वतः निर्णय न घेता सरकारने निष्पक्ष चौकशी करून निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.
500 कोटींच्या कथित व्यवहारावरूनही चंद्रकांत खैरे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे यांचं नाव या व्यवहारासंदर्भात घेतलं जात असेल, तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणामागे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आशीर्वाद असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच टायगर शॉप गोळीबार प्रकरण महापौर कार्यालय आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी या मुद्द्यावरून देखील चंद्रकांत खैरे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर आरोप केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
