Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"कुठे बोलायचं हे न्यायाधीशांना कळलं पाहिजे", सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीना माजी न्यायाधीश संजीव शर्माचा खोचक सल्ला !

"कुठे बोलायचं हे न्यायाधीशांना कळलं पाहिजे", सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीना माजी न्यायाधीश संजीव शर्माचा खोचक सल्ला !

दिल्ली : खरा पंचनामा 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी महिन्याभरापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती संजीव शर्मांवर गंभीर आरोप केले होते. यामध्ये गैरव्यवहार, वशिलेबाजी, भ्रष्टाचार अशा गोष्टींचा समावेश होता. या प्रकरणावरून देशभरात मोठी चर्चा पाहायला मिळाली.

अखेर न्यायमूर्ती संजीव शर्मा यांच्या निवृत्तीनंतर हे प्रकरण काहीसं बाजूला पडलं. मात्र, आता न्यायमूर्ती संजीव शर्मा यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या आक्षेपांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, कुठे बोलावं आणि कुठे नाही, हे न्यायाधीशांना कळलं पाहिजे, असा खोचक सल्लादेखील त्यांनी दिला आहे.

माजी न्यायमूर्ती संजीव शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीमध्ये त्यांच्यावर झालेले आरोप व त्यामागील न्यायमूर्ती संदीप मेहतांचा हेतू याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. निव्वळ व्यावसायिक मत्सरातून हे आरोप झाले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच, अनेक आप्तस्वकीयांचे खटलेदेखील आपण विशेष अधिकारांचा गैरवापर करून निकाली काढण्याचे प्रयत्न केले नसल्यामुळे आपल्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं संजीव शर्मा म्हणाले. न्यायममूर्ती संजीव शर्मांकडून पदाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचा दावा न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी केला होता.

आपल्याला या आरोपांचं आश्चर्य वाटत असल्याचं संजीव शर्मा म्हणाले. "जर अशी काही तक्रार कुणी केली जरी असेल, तर ती आधी सरन्यायाधीशांकडे का नाही गेली? याआधीही अशा प्रकारे न्यायाधीशांमधील आपापसांतील वाद समोर आले आहेत. पण ते कधीच असे चर्चेत आले नाहीत किंवा माध्यमांमध्येही जाहीर झाले नाहीत. कुणीही सोशल मीडियावर त्याबाबत बोललं नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत. जर न्यायमूर्ती संदीप मेहता त्यानुसार वागत नसतील, तर त्यांच्याविरोधातदेखील कारवाई व्हायला हवी. न्यायाधीशांवरील सामान्य नागरिकांच्या विश्वासावर परिणाम होता कामा नये", असं माजी न्यायमूर्ती संजीव शर्मा म्हणाले.

“जर न्यायाधीश एकमेकांच्या कामाच्या पद्धतींवर बोलू लागले, तर हे योग्य होणार नाही. ते माध्यमांसमोर म्हणाले की अमुक न्यायाधीशांच्या निष्ठेबाबत संशय आहे. मुळात असं काही बोलण्याचा त्यांना अधिकारही नाही आणि ते त्यांचं कामही नाही. पण त्याचा परिणाम काय झाला? राजस्थानमधील वकिलांना वाटलं की सर्वोच्च न्याययालयाचे न्यायमूर्ती असं म्हणत असतील तर त्यात तथ्य आहे आणि इथे वकील संपावर गेले", असंही संजीव शर्मांनी नमूद केलं.

दरम्यान, न्यायमूर्ती संदीप मेहतांसोबत आपण कधीही काम केलेलं नसताना त्यांना आपल्या प्रशासकीय क्षमतांबाबत कसं माहिती झालं? असा प्रश्न संजीव शर्मांनी उपस्थित केला आहे. "मी एवढंच म्हणेन की कुठे बोलावं, कुठे नाही बोलावं हे न्यायाधीशांना कळायला हवं. आपण आपल्या निकालांमधून बोलणारी माणसं आहोत. आपले निकाल तपासले जातात. मी माझ्या साडेनऊ वर्षांच्या कारकिर्दीत ८८ हजारांहून अधिक प्रकरणांवर निकाल दिला आहे", असं ते म्हणाले.

न्यायमूर्ती संदीप मेहतांवर आरोप

संजीव शर्मांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्यावर आरोप केले. "हे सगळं त्यांनी का केलं मला कल्पना नाही. कदाचित हे फक्त व्यावसायिक हेव्यातून केलं गेलेलं कृत्य असेल. २०११ मध्ये आम्हाला दोघांना वरीष्ठ वकील म्हणून बढती मिळाली. त्यांनी यासाठी अर्ज केला होता, मला कोणत्याही अर्जाशिवाय फुल कोर्टने माझी त्यासाठी निवड केली होती. पण जेव्हा मुख्य न्यायमूर्ती पदाचा मुद्दा आला, तेव्हा त्यांनी मला तिथे बढती मिळणार नाही याची खात्री केली. न्यायाधीश ज्या कुटुंबातून येतात, त्या कुटुंबाचा त्यांच्या कामावर परिणाम दिसतोच", असा आरोप संजीव शर्मांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.