एमटीडीसी रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची फसवणूक; बनावट वेबसाईटद्वारे आर्थिक गंडा; सायबर कक्षाकडे तक्रार दाखल
सिंधुदुर्गनगरी : खरा पंचनामा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्ट बुकिंगच्या नावाखाली बनावट वेबसाईट तयार करून पर्यटकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी रिसॉर्टचे आरक्षण करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन एमटीडीसीचे कोकण विभागीय प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी केले आहे.
एमटीडीसीच्या रिसॉर्टचे आरक्षण केवळ mtdc.co या अधिकृत वेबसाईटवरून किंवा एमटीडीसीच्या अधिकृत माहिती व आरक्षण कक्षामार्फतच करावे. अनोळखी अथवा संशयास्पद वेबसाईटवरून बुकिंग करून कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यटकांची फसवणूक करणारी बनावट वेबसाईट बंद करण्यासाठी तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने एमटीडीसीकडून सायबर कक्षाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी बुकिंगपूर्वी वेबसाईटची अधिकृतता तपासावी आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवरून व्यवहार टाळावा, असे एमटीडीसीने स्पष्ट केले आहे.
बुकिंग करताना अडचण आल्यास किंवा संशयास्पद प्रकार निदर्शनास आल्यास पर्यटकांनी एमटीडीसीच्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधावा. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एमटीडीसी प्रादेशिक कार्यालय तसेच सिंधुदुर्गातील ओरोस फाटा येथील प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन दीपक माने यांनी केले आहे.
पर्यटकांनी रिसॉर्टचे आरक्षण केवळ अधिकृत माध्यमातूनच करून आर्थिक फसवणूक टाळावी, असे एमटीडीसीकडून सांगण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.