सोलापूर : खरा पंचनामा
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अत्यंत अमानुषपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती. धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडच्या सांगण्यावरूनच ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराडला अटक केली असून तो सध्या कारागृहात आहे.
एकीकडे वाल्मीक कराडने क्रूरतेची सीमा ओलांडल्याचं प्रकरण ताजं असताना आता वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सुशील कराडसह त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात सोलापूरात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग करणे आणि मारहाण करणे, अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपांनंतर सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजे या तिघांनी मिळून हे गंभीर कृत्य केलं आहे. आरोपींनी पीडित महिला, तिचा पती आणि तिच्या अल्पवयीन मुलीला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी पीडित कुटुंबाला धमकावून त्यांच्या नावावरील प्लॉट आणि सोन्याचे दागिने बळजबरीने स्वतःच्या ताब्यात घेतले. तसेच पीडितेची ६ वाहनेसुद्धा बेकायदेशीरपणे बळकावून स्वतःच्या ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
हा सर्व प्रकार २०२४ मध्ये घडला होता. गंभीर गुन्हा घडलेला असतानाही सुरुवातीला तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याने पीडित महिलेने न्यायासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्देश दिल्यानंतर, सोलापूर पोलिसांनी अखेर या प्रकरणात कारवाई करत सुशील कराड आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. सोलापूरच्या या प्रकरणात थेट वाल्मीक कराडच्या मुलाचं नाव समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
