जंतर-मंतरवर गोंधळ ! निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झालेले आप नेते सौरभभारद्वाज यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
दिल्ली : खरा पंचनामा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेणाऱ्या विविध संघटना व राजकीय पक्षांच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेत संपूर्ण परिसर मोकळा केला आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आम आदमी पार्टीचे (AAP) दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि नेते सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर मोठा राजकीय संग्राम पाहायला मिळाला. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) सह विविध विरोधी पक्षांच्या आव्हानानंतर आंदोलक जंतरमंतरवर जमा झाले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत अवघ्या काही मिनिटांतच संपूर्ण परिसर रिकामा केला. या संदर्भातील वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तसंस्थेने दिले आहे.
या कारवाईदरम्यान आम आदमी पार्टीचे (AAP) ज्येष्ठ नेते सौरभभारद्वाज यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंतरमंतरवर कडक नाकेबंदी केल्यानंतरही आंदोलकांचे गट जनपथ आणि टॉलस्टॉय मार्ग परिसरात घोषणाबाजी करताना दिसून आले.
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. सुरक्षेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती.
खबरदारीचा उपाय म्हणून मध्य दिल्लीत सुमारे ५,००० सुरक्षा कर्मचारी, जलद कार्यदल (RAF) आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात 'द इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राने निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत एक बातमी प्रसिद्ध केली होती. या अहवालानंतर निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
सौरभ भारद्वाज यांची प्रशासनावर टीका
आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वी आणि ताब्यात घेण्याआधी माध्यमांशी बोलताना सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. आपण सर्वसामान्यांप्रमाणे मेट्रो आणि रिक्षाचा वापर करून जंतरमंतरवर पोहोचल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
"शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. आम्ही ६ दिवसांपूर्वीच या आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. परंतु, सरकारविरोधी आवाज दाबण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली," असा आरोप भारद्वाज यांनी केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.