विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला, शिंदेंच्या शिवसेनेतून माजी आमदाराची आधीच बंडखोरी ?
अमरावती : खरा पंचनामा
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चार जिल्ह्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बिहार, कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांसह महाराष्ट्रातही शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.
22 सप्टेंबर 2026 निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पाच जागांवर निवडणूक होणार असून यामध्ये 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. येत्या 23 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 27 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निवडणुका आयोगाने या निवडणुका जाहीर केल्याने आता सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीने 3-1-1 असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.
महायुतीने या निवडणुकीसाठी जोरदार तयार सुरू केली आहे. अशातच आता एकीकडे महायुतीच्या फॉर्म्युल्याची माहिती समोर आल्यानंतर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने अमरावती शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सुद्धा भरल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, शिंदेंच्या या नेत्याने पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन्ही अर्ज भरल्याने त्यांच्या बंडखोरीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाही आपला अर्ज भरला आहे. मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदे सेनेत आहे, असे म्हणत श्रीकांत देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार श्रीकांत देशपांडे म्हणाले की, "मी 1992 पासून शिवसेनेत कार्यरत आहे आणि पहिल्या दिवसापासून शिंदे सेनेत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. म्हणूनच मी पहिला अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे. कारण जर पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही. उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर शिक्षक आघाडी या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढवेन, असे श्रीकांत देशपांडे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
श्रीकांत देशपांडे हे 2014 च्या विधानपरिषद निवडणुकीत अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर 2020 ची निवडणूक त्यांनी 'शिक्षक आघाडी'चे उमेदवार म्हणून लढवली होती. परंतु अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कार्यरत असून त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ शिक्षकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे बांधणी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.