चार मंत्र्यांना डच्चू? नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत फेरबदलाचे वारे
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दसऱ्यानंतर शिवसेनेत मंत्रिमंडळ फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा असून, अशा मंत्र्यांना मंत्रिपदावरून हटवले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे शिवसेनेच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संभाव्य फेरबदलात तरुण आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. तसेच काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागू शकते.
संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट, संजय राठोड, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे, सध्या राज्यमंत्री असलेले योगेश कदम आणि आशिष जयस्वाल यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय शिवसेनेतील काही नव्या आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
मंत्र्यांच्या कामगिरीवर एकनाथ शिंदे नाराज
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेताना एकनाथ शिंदे यांनी काही मंत्र्यांबाबत नाराजी केली आहे. जनतेची कामे मार्गी लावणे, मतदारसंघातील प्रश्न सोडवणे आणि पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी मंत्र्यांना दिल्याची माहिती आहे.
यापूर्वीही कामगिरीत सुधारणा न झाल्यास मंत्रिपद गमवावे लागू शकते, असा इशारा देण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे संभाव्य फेरबदलात मंत्र्यांच्या कामगिरीचा निकष महत्त्वाचा ठरणार आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ज्या मंत्र्यांकडे विशिष्ट जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांनी त्या जिल्ह्यांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आता दसऱ्यानंतर शिवसेनेत खरोखरच मंत्रिमंडळ फेरबदल होणार का, कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, संभाव्य फेरबदलाबाबत अधिकृत माहिती समोर आली नसल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.