दिल्ली : खरा पंचनामा
जेफ्री एपस्टिनचं भूत पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी मोठा बॉम्ब टाकला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा एपस्टिनसोबतचा मिटिंग करत असतानाचा एक फोटो संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे.
पुरी यांचे एपस्टिन यांच्यासोबत संबंध होते, हे आता स्पष्ट झालं आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
रिजिम चेंजमध्ये एपस्टिन फाईलचाही मोठा सहभाग असणार असल्याचा दावाही राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधून हा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मी कधीच एपस्टिनला भेटलो नसल्याचं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. आपला एपस्टिनशी संबंद नसल्याचं ते म्हणत होते. पण काल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हरदीप सिंग पुरी आणि एपस्टिन यांचे खासगी फोटो बाहेर आले आहेत.
रिजिम चेंजमध्ये एपस्टिनचा मोठा सहभाग असेल. काही विकेट पडणार आहेत. त्यात एपस्टिन प्रकरणाचा मोठा सहभाग असणार आहे. हरदीप पुरींना अमेरिकेने खोटं ठरवलं आहे. अमेरिकेकडे एपस्टिन प्रकरणाचे गुप्त फोटो आहेत. ते कधी काढायचं हे त्यांना माहीत आहे, असं संजय राऊत म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मुंबईत होते. त्याच दरम्यान एपस्टिनची एक फाईल उघडली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दिल्लीला गेले नाहीत. मोदींना भेटले नाही. अनेक नेते अहमदाबादला जात होते. पण आता हे व्हिआयपी मुंबईत येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
केवळ एपस्टिन फाईलने सत्ताबदल होणार नाही. अनेक प्रसंग आहेत. अनेक घडामोडी घडतील. अनेक फाईल्स उघडल्या जातील. जनतेचा उद्रेक अधिक तीव्र झालेला दिसेल. तुम्हाला भूगर्भातील हालचाली दिसतात. या क्षणी मोदी आणि अमित शाह हतबलतेने बसले आहेत. ते हातपाय हलवत आहेत. ते राज्य चालवू शकत नाही, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.
पुरी यांचा एपस्टिनसोबतचा कथित फोटो आल्यानंतर काँग्रेसने पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनुराग ढांडा यांनीही भाजपला घेरलं आहे. पुरी डेलिगेशन सोबत एपस्टिनला भेटले नव्हते, तर एकटेच भेटले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ते एपस्टिनला भेटले होते, असा आरोप ढांडा यांनी केला आहे.
दरम्यान, पुरी यांनी आपण चुकीचं काम केलं नसल्याचं म्हटलं आहे. एपस्टिनसोबत व्यवसायिक गुंतवणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी लिंक्डइनचे सह संस्थापक रीड हॉफमॅन यांच्याशी माझा मुख्य संपर्क होता. एपस्टिनच्या बाकीच्या गोष्टींबाबतची त्यावेळी मला माहिती नव्हती, असं पुरी यांनी म्हटलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
