"मीरा भाईंदर जैनांची नगरी, मिनी राजस्थान", भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचं विधान चर्चेत; मनसेचंही प्रत्युत्तर
मुंबई : खरा पंचनामा
भाजपा आमदार नरेंद्र मेहता सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाची चर्चा असून यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
मीरा भाईंदर हे जैन नगरी असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला असून त्यावर अनेक मराठी भाषिक नेटिझन्सने तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच, मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
“मी अशा नगरीतून येतो जिथं मिनी राजस्थान, जैनांची नगरीही म्हटलं जातं. मीरा भाईंदरमध्ये ३३ पेक्षाही जास्त जैनालय आहेत. साधु-महात्मांचं आगमन येथे होत असतं. गुरूदेवांचं माझ्यावर निरंतर आशीर्वाद असतो. यावेळी अत्यंत अटीतटीची निवडणूक होती, पण त्यांचा आशीर्वाद मिळाला की प्रेरणा मिळते. माझं भाग्य आहे की माझा जन्म जैन कुळात झाला. मीरा भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा जैनांचा विषय येतो तेव्हा आम्ही ताकदीने उभे राहतो", असं नरेंद्र मेहता म्हणाले. ते ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नरेंद्र मेहता यांच्या शाळेमध्ये कंदमुळांवर बंदी आणली होती. यावेळीही मोठा वाद झाला होता. यावर नरेंद्र मेहता म्हणाले, “मी शाळाही चालवतो. पर्युषण काळात माझ्या शाळेत कंदमुळे खाण्यास बंदी आहे. यावरून प्रचंड वाद झाला. परंतु, आम्ही मागे हटलो नाही. मी बंदी कायम ठेवली. आम्ही आमच्यावर विचारांवर चालत आलोय."
जैन समाजातील धर्मगुरुंसाठी पांढरी पट्टी आखल्यावरूनही काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. यावरून मेहतांनी वक्तव्य केलं. जैन गुरू अनवाणी चालतात, त्यामुळे त्यांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून पांढऱ्या पट्ट्या लावल्या, त्यावरही आम्ही मागे हटलो नाही, असं मेहता म्हणाले.
दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्या या विधानावर मनेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसेचे मीरा भाईंदर विधानसभेचे अध्यक्ष सचिन पोपळे यांनी नरेंद्र मेहतांवर टीका केली. ते म्हणाले, "मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी ठाण्यात जाऊन गरळ ओकली आहे. त्यांचं म्हणणं आहे की मीरा भाईंदर ही जैनांची नगरी आहे. नरेंद्र मेहताजी उलटे सुलटे धंदे बंद करा आणि वाद वाढवणं बंद करा. मनसे तुम्हाला ठाम सांगते की मीरा भाईंदर हे कोळी, आगरी आणि मराठी माणसांचं आहे. "
“पर्युषण काळात तुम्ही लहान मुलांच्या डब्यात कंदमुळे बंद केली. त्याला मनसेने विरोध केला. तेव्हा तुमच्या शाळेच्या पोर्टलवरून तुम्ही हा नियम मागे घेतला. तिसरं तुम्ही सांगितलं की जैन मुनी फिरतात तेव्हा पांढरे पट्टे मारले. पांढऱ्या पट्ट्यांचा वाद वाढला तेव्हा मनसेने तिथे जाऊन काळे पट्टे मारले होते. त्यामुळे नसते डायलॉग बंद करा. लहान मुलांच्या डब्यात कंदमुळे चालत नाहीत, पण तुमच्या हॉटेलमध्ये दारू विकता, तिथं सगळी कंदमुळे विकली जातात. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये धर्म लागतो पण व्यवसायात आणि पैसे कमावण्यासाठी धर्म लागत नाहीत", असं सचिन पोपळे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.