जकाई देवीच्या घरफोडीतील ७ आरोपी जेरबंद आणि ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे जकाई देवीचे चांदीचे दागिने आणि घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत सात आरोपींना जेरबंद केले आहे. आटपाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकूण ९ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ किलो २४३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि दोन मोटारसायकलचा समावेश आहे.
गेल्या जून महिन्यात नेलकरंजी येथील रुक्मीणी बाळासाहेब भोसले यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान केले होते आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना सांगली LCB शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गोपनिय बातमीदाराच्या मदतीने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सांगली-कोल्हापूर रोडवरील झुलेलाल मंदिराकडे जाणाऱ्या परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरबाज जैनुल मिराखान (रा. रुई, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), बादशाह अल्हाबक्ष यमतनाळ (रा. कबनूर, ता. हातकणंगले), सोहेल महम्मद रफिक दड्डीकर (रा. कबनूर), प्रमोद रावसो सव्वाशे (रा. कबनूर), शशीकांत अशोक दबडे (रा. नेलकरंजे, ता. आटपाडी), विनायक सुनिल पाटील (रा. रुई) आणि विनोद रावसाहेब यादव (रा. व्हन्नूर, ता. कागल) यांचा समावेश आहे. तसेच या गुन्ह्यात अन्य काही जण देखील सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. जप्त करण्यात आलेल्या चांदीच्या दागिन्यांमध्ये छत्र, समई, घोडा, पाळणे, घंटा, किरीट, पैंजण, गणपतीची मूर्ती आणि चांदीच्या नाण्यांचा समावेश असून हे सर्व आरोपी मुद्देमाल विक्री करण्यासाठी येणार असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले. सर्व आरोपी आणि जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, सुभाष सुर्यवंशी, संदीप नलावडे, अनिल कोळेकर, सागर लवटे, सागर टिंगरे, सतीश माने, अमर नरळे, राजाराम मुळे, अमीरशा फकीर, मोतीराम खोत, उदयसिंह माळी, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, महादेव नागणे, विक्रम खोत, सुनिल जाधव, करण परदेशी, अजय पाटील, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
