"महाराष्ट्राचे गृहमंत्री पांडू हवलदार", टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
अकोला : खरा पंचनामा
महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारांना मोकळे रान आणि जनता दहशतीच्या छायेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज आहे. गृहमंत्री पांडू हवलदार असल्याची खरमरीत टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे केली. नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावर गोळीबार झाल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने ते अकोल्यात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महायुती सरकारने जंगलराज निर्माण केले
महाराष्ट्रात महायुती सरकारने जंगलराज निर्माण केले. मुंबईसारख्या महानगरात अभिनेता टायगर श्रॉफवर भररस्त्यात गोळीबार होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाला. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही आणि पोलीस प्रशासनावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री पांडू हवालदार आहेत. राज्याचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवतो. गुन्हेगारांना मोकळे रान आणि जनतेला दहशतीच्या छायेत ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यायला हवा, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली.
'गँग ऑफ ट्रिपल इंजिन' सरकारसह त्यांच्या हस्तकांचे टोळी युद्ध
महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. टोळीयुद्ध सुरू झाले. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना सातत्याने धमक्या येत आहेत. गत काळातील काँग्रेस सरकारने जे केले होते, त्याचे उलटे पाढे आता सुरू झाले आहेत. पुन्हा खंडणीसाठी धमक्या सुरू झाल्या. सिनेअभिनेत्यांना लक्ष्य केले जात असून बाबा सिद्दिकी यांची सुद्धा हत्या करण्यात आली. 'गँग ऑफ ट्रिपल इंजिन' सरकारचेच टोळी युद्ध सुरू नसून त्यांच्या हस्तकांच्या टोळ्या देखील बाहेर पडून गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनाची नाहीत तर मनाची तरी काही तरी बाळगावी, असा टोला देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.